esakal | प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे निधन 

बोलून बातमी शोधा

प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे निधन }
प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे निधन 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक -विशेष मुलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अन्‌ प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा रजनीताई नागेश लिमये (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 16) दुपारी बाराला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांच्या त्या मोठ्या भगिनी होत. 

गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सुरवातीला काही वर्षे त्यांनी पुष्पावती रुंग्ठा कन्या विद्यालयात नोकरी केली. स्वतःचा मुलगा गौतम हा विशेष गतीमंद असल्याचे निदान झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात अशा विशेष मुलांसाठी कुठेही शिक्षणाची सोय नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी 1 जानेवारी 1977 ला कुमुदताई ओक, डॉ. शिरीष सुळे यांच्या मदतीने सर्कल चित्रपटगृहाच्या चार मुलांना सोबत घेऊन प्रबोधिनी शाळेची सुरवात केली. पुढे प्रबोधिनी ट्रस्टची स्थापना केली. आता प्रबोधिनी ट्रस्टअंतर्गत प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा (प्रौढ मानसिक अपंगांसाठी), प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षक केंद्र, श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिर आणि सावली बालवाडी, प्रबोधिनी वसतिगृह असे विविध विभाग शहरात कार्यरत आहेत. या शाळेत आज 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

विशेष मुलांची "माता'च 
विशेष मुलांच्या शिक्षणासाठी रजनीताईंनी देश, परदेशात अभ्यास दौरे केले. अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी प्रबोधिनीशी जोडले. राज्य सरकारच्या मतिमंद मुलांसाठीचा अभ्यासक्रम, त्यांच्यासाठीचे कायदे यांसारख्या समितीवर त्यांनी काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या तीन वर्षे अधिसभा सदस्या होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच दलितमित्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा "जीवनगौरव', सह्याद्री वाहिनीचा "हिरकणी' अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संस्थेत शिक्षण घेतलेली आज अनेक मुले विविध कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांचा मुलगा गौतम याला राज्य सरकारचा आदर्श अपंग कामगार पुरस्कार मिळाला आहे. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

नाशिकमध्ये उद्या श्रद्धांजली 
रजनीताई लिमये यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी (ता. 18) दुपारी साडेतीनला श्रद्धांजली सभा होईल. शहरातील जुनी पंडित कॉलनीतील प्रबोधिनी विद्यामंदिरमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती प्रबोधिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली. 

रजनीताई लिमये यांचे अल्पचरित्र 
- नाव ः रजनी नागेश लिमये 
- जन्म ः 17 मे 1936 
- पतीचे नाव ः नागेश लिमये (तार खात्यातून निवृत्त) 
- शिक्षण ः एम.ए., बी. एड., डिप्लोमा कोर्स इन स्पेशल एज्युकेशन (अकरावी बोर्डात ठाणे जिल्ह्यात प्रथम) 
- 1 जानेवारी 1977 ला प्रबोधिनीची स्थापना 
- लिहिलेली पुस्तके ः जागर, ध्यानीमनी प्रबोधिनी, "गोडुली गाणी' बालगीतसंग्रह 
- मिळालेले पुरस्कार ः राष्ट्रपती पुरस्कार, दलितमित्र, सावानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव, हिरकणी, श्‍यामची आई, प्रबोधिनी ट्रस्टचा फुले, शाहू-आंबेडकर पुरस्कार, दादरच्या वनिता समाज मंडळाचा पुरस्कार, पुण्यातील माई पारखे पुरस्कार, कोल्हापूरच्या हेल्पर्स हॅन्डीकॅप संस्थेचा पुरस्कार, उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेचा सुशीला पुरस्कार, मानवता हेल्थ फाउंडेशनचा जाणीव पुरस्कार, लायन्स क्‍लबचा हेलन केलर पुरस्कार आदी. 
- अनेक वर्तमानपत्रे, मासिके, विशेषांक यातून मुलाखती प्रसिद्ध 
- साम टीव्हीवर जागतिक महिला दिनानिमित्त "संघर्ष जीवनाचा' या कार्यक्रमात सहभाग