भद्रकालीदेवीच्या अंगणी कलावंतांकडून जागर

भद्रकालीदेवीच्या अंगणी कलावंतांकडून जागर

नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र आदिशक्‍तीची उपासना सुरू असताना त्याचे औचित्य साधत या महिन्याचा ‘सकाळ कलांगण’ उपक्रम भद्रकालीदेवी मंदिरात घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी होत दिग्गज, तसेच हौशी चित्रकारांनी मंदिर व जुने नाशिक परिसर रंग-रेषांच्या सहाय्याने कॅनव्हासवर उतरवला. काही कलावंतांनी बहारदार गायन, वादन, तर काहींनी कविता, अभिनय सादर करत भद्रकाली देवीच्या अंगणी कलेचा जागर केला. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन केले.

याप्रसंगी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार झळके, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भद्रकाली मंदिराचे अध्यक्ष दत्तात्रय पैठणकर यांच्यासह पदाधिकारी उदयन दीक्षित, अतुल गर्गे, उपेंद्र देव, सुरेश शुक्‍ल, ज्येष्ठ कलाकार प्रकाश गायकवाड, दी ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन ऑर्गनायझेशनचे अरुण भारस्कर व भगवान पवार, अधिष्ठाता बाळ नगरकर, सुमन हिरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भद्रकाली मंदिर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळी आठपासून चित्रकारांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती नोंदविली. या वेळी मंदिरापासून मेन रोडकडील गल्लीचे दृश्‍य, तर कुणी दगडी पायऱ्यांसह मंदिराचे वैभव आपापल्या शैलीत कॅनव्हासवर उतरविण्याचा प्रयत्न केला. मंदिर परिसरात चित्रकार ठाण मांडत चित्राविष्कार साकारण्यात मग्न झाले होते. चित्रकलेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही ज्येष्ठांना चित्र रेखाटताना बघत चित्रकलेचे धडे गिरविले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्येही उपक्रमाविषयी उत्सुकता बघायला मिळाली. या वेळी नारायण चुंभळे यांनी स्थानिक नगरसेविका वत्सला खैरे यांच्या चित्रकृतीची रांगोळी साकारली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिल्पकार सुरेश भोईर, किरण भोईर, सुलेखनकार नंदू गवांदे, चित्रकार रमेश जाधव, प्रा. दीपक वर्मा, ‘मविप्र’च्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजा नरवाडे, विनोद राठोड, बाळासाहेब पाटसकर, नारायण चुंभळे, मुरलीधर रोकडे, भालचंद्र कुरजेकर, वेणू कुरजेकर, प्रमिला भामरे, आर्किटेक्‍ट प्रवीण सरागे, प्राचार्य श्रीकांत गोऱ्हाणकर, राहुल कहांडळ, सुरेश गायधनी, आनंद अत्रे, नंदकुमार खाडे, प्रफुल्ल चव्हाण, पंकज गवळी, सुभाष वाघ, विजय निपाणेकर, शंकर बर्वे, रमाकांत चव्हाण, सचिन मालेगावकर आदी उपस्थित होते. 

भगवान पवार यांचे व्हायोलिनवादन; अरुण भारस्करांनी वाजविली बासरी
वेगवेगळ्या कलांचे सादरीकरण होताना उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले ते दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भगवान पवार व अरुण भारस्कर यांनी. दृष्टिबाधित असलेल्या भगवान पवार यांनी सुरेख पद्धतीने व्हायोलिनवादन करत कलेला कुठल्याही सीमा आडव्या येऊ शकत नाहीत, हे सोदाहरण सिद्ध केले. अरुण भारस्कर यांनी बासरीवर भजन सादर करत उपस्थितांकडून दाद मिळविली. या दोन्ही कलावंतांचे उपस्थित कलारसिक, भाविकांनी विशेष कौतुक केले.

‘सकाळ-कलांगण’तून कवींची भक्‍कम फळी
कला सादरीकरणासाठी मुक्‍त व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ-कलांगण’च्या माध्यमातून स्वरचित कविता लिहिणाऱ्यांची भक्‍कम फळी निर्माण होते आहे. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत स्वचरित कविता सादर करण्याऱ्या राहुल कहांडळसोबतच आजच्या कार्यक्रमात शिलापूर येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी शुभम पगार, वेणू कुरजेकर यांनी कविता सादर केली. ‘मविप्र’च्या ललित कला महाविद्यालयातील रविना खोडे हिने हरिवंशराय बच्चन यांची कविता वाचून दाखविली.

गोपाळचे गायन अन्‌  प्रवीणचा नृत्याविष्कार
या कार्यक्रमात सिन्नर येथून प्रवीण आंबेकर व गोपाळ गोसावी हे कलावंत खास सहभागी झाले होते. आपल्या पातळीवर कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या या कलावंतांनी आजच्या कार्यक्रमातही सहभागींचे लक्ष वेधले. प्रवीण आंबेकर यांनी नृत्याविष्काराची झलक सादर करत कौतुकाची थाप मिळविली. गोपाळ गोसावी यांनी मिमिक्री करत उपस्थितांचे मनोरंजन केले. 

सुरेल भक्तिगीतांतून आदिशक्‍तीची उपासना
या कार्यक्रमात क. का. वाघ परफॉर्मिंग आर्ट येथील विद्यार्थ्यांनी आनंद अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गाणी सादर केली. या भक्तिगीतांच्या माध्यमातून आदिशक्‍तीची उपासना करण्यात आली. प्रारंभी गणेशवंदना सादर केल्यानंतर सुरेल आवाजात सादर केलेल्या भक्तिगीतांनी परिसरातील वातावरण अधिकच भक्तिमय बनले होते. आनंद अत्रे यांनी गाणे सादर केले. सोबतच विपुल आपटे व हर्षद गोळेसर यांनीही गायन केले. त्यांना तबल्यावर प्रफुल्ल पवार, व्यंकटेश तांबे यांनी साथ दिली. कीबोर्डवर कुणाल बसरे याने साथ दिली. भक्तिगीतांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कलाप्रेमींनी अनुभवला भद्रकाली देवीचा महाआरती
यादरम्यान उपस्थित असलेल्या कलाप्रेमींना भद्रकाली देवीचा महाआरती सोहळा अनुभवता आला. सकाळी अकराच्या सुमारास नित्याच्या महाआरतीची वेळ झाल्याने मोठ्या भक्तिभावाने भद्रकाली देवीची आरती करण्यात आली. विधिवत पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात उपस्थित कलारसिकांनी सहभाग नोंदवत सर्वांच्या मांगल्याची प्रार्थना देवीकडे केली.

प्रकाश गायकवाड यांच्या अभिनयाने अंगावर शहारे
केंद्र सरकारची नोकरी सांभाळत सुमारे वीस चित्रपटांत अभिनय केलेले ज्येष्ठ कलावंत प्रकाश गायकवाड यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. त्यांनी ‘जिव्हाळा’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेची झलक सादर केली. या अभिनयातून त्यांनी उपस्थित सर्वांच्या अंगावर शहारे आणले.

व्यंग्यचित्रकार झळकेंकडून सादरीकरणासोबत मनोरंजन
ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके यांनी या वेळी व्यंग्यचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी यापूर्वी रेखाटलेली विविध व्यंग्यचित्रे कथास्वरूपात सादर करताना उपस्थितांचे मनोरंजन केले. सोबतच उपस्थित कलाप्रेमींसमोर श्री. झळके यांनी व्यंग्यचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक दाखविले. कागदावर हात फिरवत रेखाटलेल्या चित्राकृतींनी उपस्थितांना थक्‍क केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com