'समृद्धी'बाबत पवार यांची शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

बाधित शेतकऱ्यांचे 50 प्रतिनिधी उपस्थित राहणार

बाधित शेतकऱ्यांचे 50 प्रतिनिधी उपस्थित राहणार
नाशिक - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोधात उभ्या ठाकलेल्या संघर्ष समितीला सोबत घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार येत्या शुक्रवारी (ता. 14) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या बैठकीत ते समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहेत.

या बैठकीस बाधित शेतकऱ्यांच्या 50 प्रतिनिधींसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कांगो व समृद्धी महामार्ग विरोधातील संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेऊन समृद्धी महामार्गामुळे उद्‌ध्वस्त होणाऱ्या बागायती शेतीबाबत कैफियत मांडली होती. त्या वेळी पवार यांनी "समृद्धी'चा प्रश्‍न समजून घेत सरकारने बागायती जमीन वगळून महामार्ग न्यावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे झालेल्या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांबरोबर असल्याची ग्वाही पवार यांनी दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news sharad pawar meeting with chief minister for samruddhi highway