पळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली.

नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली.

एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते. परदेशातील लोककलेचे अभ्यासक गीबावा हे या कलेचा आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गावात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. ही कला सादर करणारे रामदास गायधनी, उत्तम गायधनी, रघुनाथ ढेरिंगे, नंदू गायधनी असे वीस कलावंत गावात आहेत. इथे उत्पादित होणारा मुळा राज्यभर प्रसिद्ध आहे. याच गावातील दोनशे तरुण अभियंते झाले आहेत. शेतकऱ्यांनी एकत्रित येत गटाची स्थापना केली असून पन्नास तरुण उत्पादक ते थेट ग्राहक असा भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करतात. त्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य लाभलेले आहे. गावात संत आईसाहेब महाराज यांची समाधी आहे. परिसरात पळसाची झाडे अधिक होती म्हणून गावाची ओळख पळसे असे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

"सकाळ'च्या स्पर्धेतून चित्रकलेची आवड 
 
गावातील पळसे ग्रामविकास मंडळ संचलित संत आईसाहेब इंग्लिश स्कूलमध्ये आठशे विद्यार्थी शिक्षण घेताहेत. "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेचे केंद्र या शाळेत असून "सकाळ'च्या स्पर्धेमुळे शाळेतील 70 विद्यार्थी चित्रकलेचे उच्च शिक्षण घेताहेत. शाळेतील माजी विद्यार्थी योगेश गायधनी याने आपल्या शाळेसाठी आराखडा स्वतः केला. या शाळेची विद्यार्थिनी अश्‍विनी टिळे या पोलिस उपनिरीक्षक झाल्या आहेत. हे कमी काय म्हणून शाळेतील दीपिका खैरनार, चैताली टिळे आणि कल्पना तिदमे या तिघींनी दहावीत गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवलेत. इथे फुटबॉल आणि बॉक्‍सिंग हे खेळ खेळले जातात. त्यातून अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरापर्यंत पोचलेत. गावात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होते. 

महिला अन पुरुषांचे भजनी मंडळ
विठ्ठल-रुखमाई, मारुती, भैरोबा, शितळा देवी आदी मंदिरे गावात आहेत. दारणा नदीच्या काठावरील गावात अहिल्यादेवी होळकर कालीन बारव आहे. आता तिची अवस्था बिकट झाली आहे. गावात प्रवेश करताना शंभर वर्षांची जूनी वेस प्रत्येकाचे स्वागत करते. गावात संत आईसाहेब भजनी मंडळ असून ज्ञानेश्‍वर गायधनी, दामूअण्णा गायधनी, मधुकर गायधनी, वसंतराव थेटे, वसंतराव ढेरिंगे, भगवानराव थेटे आदींचा त्यात सहभाग असतो. महिला भजनी मंडळात रुपाली गायधनी, सुनिता गायधनी, आरती गायधनी, निर्मला गायधनी, मीराबाई गायधनी आदी सहभागी होतात. राज्यात कीर्तनकार म्हणून ओळख निर्माण करणारी गायत्री गुजदेकर ही इथलीच. गावच्या पहिलवानांनी नाव कमावले. निवृत्ती गायधनी, रामदास गायखे, चंदर गायखे, कारभारी गायखे आदींचा त्यात समावेश आहे. नवीन पिढी मात्र कुस्त्या खेळण्यास तयार नसल्याची खंत राजाभाऊ गायधनी यांनी व्यक्त केली. 

हिंदू-मुस्लीम एेक्याचा संदेश

भैरोबाचा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेस गावात होतो. मारुती यात्रोत्सवही होतो. शिंदे आणि पळसे गावातील ग्रामस्थ एकत्रितपणे बंगालीबाबांच्या यात्रोत्सव करतात. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा हा उत्सव असतो. गावातील वाचनालयात दहा हजार पुस्तके असून इथे व्यायामशाळाही आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कविता महाजन, कल्पना दुधाळ आदी गावात येऊन गेले आहेत. गावाचे भूमिपुत्र निवृत्ती गायधनी हे पहिले आमदार. गावात दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. 

गायखे-गायधनी-आगळे परिवार 
 
करमाळाशेजारील बाभूळगाव येथून आलेले अनेक जण गावात निवासी आहेत. गायखे, गायधनी आणि आगळे हे परिवार इथले. गावात "दुश्‍मन' चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांचा त्यानिमित्ताने गावात मुक्काम होता. रुपाली गायखे यांनी "जय मल्हार' या मालिकेत भूमिका साकारली आहे. 

आमच्या गावाच्या हद्दीत नाशिक साखर कारखाना आहे. तो सात वर्षांपासून बंद आहे. गावाची 220 एकर जमीन कारखान्यासाठी दिली होती. पण कारखाना बंद असल्याने शेतकरी आणि कामगारांचे हाल सुरु आहेत. शेतीला उर्जितावस्था यावी म्हणून कारखाना पुन्हा सुरु होण्याची आवश्‍यकता आहे.
-विष्णूपंत गायखे (अध्यक्ष, पळसे ग्रामविकास मंडळ) 
 

गावात लग्न सोहळ्यावेळी जात्यावरील गाणे म्हणणारे पुरुष गायक आहेत. आमची ही परंपरा शेकडो वर्षे जूनी असून आम्ही एक रुपायाही न घेता ही कला सांभाळतो आहे. 
- रघुनाथ ढेरिंगे (गायक) 

गावात दगडी चिरा आहे. त्यांचा अभ्यास व्हायला हवा. तसेच अहिल्यादेवी होळकरांच्या बारवचे संवर्धन व्हायला हवे. गावात प्रती रायगड शिवस्मारक लोकवर्गणीमधून तयार केले आहे. तसेच गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह होतो. 
- प्रमोद गायधनी (ग्रामस्थ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Palase-Village