
नाशिक : मनपा अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा कमकुवत
नाशिक : कर म्हणजे महापालिकेच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा, परंतु हा दुवा सातत्याने कमकुवत होत चालला आहे. तब्बल ९ वर्षापासून करवसुली विभागात मनुष्यबळ वाढलेले नाही. उलट या महत्त्वाच्या विभागात कर्मचारी संख्या कमी होत असताना महसूल वसुली मात्र शंभर टक्क्यांच्या पुढेच राहिली आहे. गरजेच्या तुलनेत ९ वर्षात ३५ टक्केने मनुष्यबळ घटले आहे. सध्या महापालिकेत आर्थिक स्वयंपूर्णतेचा विचार सुरू असताना महसूल मिळवून देणाऱ्या विभागांना पुरेशा मनुष्यबळ मिळणार का, हा प्रश्न आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थकारणात तिजोरीत करवसुली हा एक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. घर व पाणीपट्टी त्यापैकी प्रमुख स्रोत आहे. नाशिक महापालिकेत गेल्या १३ वर्षापासून या विभागात कर्मचारीच वाढले नाही. नाशिक शहराचा विस्तार होत असताना दरवर्षी नवीन घर, नवीन नळ कनेक्शन वाढत असताना त्यांच्याकडून वसुलीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग मात्र घटत आहे.
महापालिकेत या विभागाकडे २०१३ मध्ये २७० इतके मनुष्यबळ होते. सध्या जेमतेम ९६ कर्मचाऱ्यांवर या विभागाचा गाडा सुरू आहे. २०१३ आर्थिक वर्षात ३ लाख १० हजार घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. आता हीच संख्या ४ लाख ८० हजारावर गेली आहे. नळपट्टी वसुलीची संख्या अशाच पद्धतीने वाढली आहे. दीड लाखांहून ही संख्या २ लाख १० हजारावर पोचली आहे. सेवानिवृत्ती व इतर कारणांनी कर्मचारी संख्या घटली आहे. त्याचवेळी कामाचा ताण मात्र कर्मचाऱ्यांवर सातत्याने वाढत आहे. पैसे आणून देणाऱ्या या विभागाला पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध झाल्यास हे काम अधिक गतिमान होईल, असे विभागातील कर्मचारी सांगतात.
कामाचा ताण
कर्मचारी घटत असताना वाढत्या कामाचा ताण पेलताना या विभागाने कामकाज पद्धतीत अनेक बदल स्वीकारले आहे. पूर्वी घरपट्टी वसुलीला वेगळे कर्मचारी, पाणीपट्टी वसुलीला वेगळे कर्मचारी कार्यरत होते. मात्र, आता या विभागात दोन्ही काम एकानेच करण्याची पध्दत सुरु केली. प्रति कर्मचारी २५०० ते ३५०० मिळकती आणि ५०० ते १ हजाराच्या आसपास नळ कनेक्शनच्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे सरासरी महिन्याला ३ हजार तर दिवसाला सुट्या धरुन शंभर ग्राहक सांभाळण्याचे या विभागावर आव्हान आहे.
शहरीकरण झपाट्याने वाढत असताना कामाचा ताण स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी विभागाला दिलेल्या उद्दिष्टानुसार महसूल वसुली होत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातही विभागाने शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
- अर्चना तांबे, उपायुक्त समाजकल्याण, कर, मनपा