esakal | दहावी-बारावीच्या सतरा नंबर फॉर्मसाठी संपेना अडथळ्यांची शर्यत | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

Online Admission

दहावी-बारावीच्या सतरा नंबर फॉर्मसाठी संपेना अडथळ्यांची शर्यत

sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : दहावी व बारावीच्‍या फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेस खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज (फॉर्म नंबर सतरा) करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु संकेतस्‍थळ सुरळीत नसल्‍याने विद्यार्थ्यांसह पालकांना अर्ज भरण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे. शिक्षण मंडळाने अर्ज भरण्याची मुदत वाढविली खरी, परंतु त्‍याआधी संकेतस्‍थळातील तांत्रिक बिघाड दूर करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होत आहे. सध्यातरी सतरा नंबर फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी- पालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत सतरा नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी परीक्षेकरिता नावनोंदणी केलेल्‍या अर्जाची प्रत काढून, शुल्क व कागदपत्रांसह अर्जावरील संपर्क केंद्र, शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांत जमा करायची आहे. मात्र अर्ज भरलाच जात नसल्‍याने पुढील प्रक्रिया राबवायची कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेशाचे अर्ज भरताना संकेतस्‍थळावरील तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थी-पालकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले होते. मात्र, या चुकीतून यंत्रणेने धडा घेतलेला नसल्‍याचे सध्या बघायला मिळते आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्‍याने पालकांकडून संताप व्‍यक्‍त होत आहे.

अशी आहे मुदतवाढ

यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार काल (ता.१२) पर्यंत अर्जाची मुदत होती. परंतु या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्‍यानुसार आता २७ ऑक्‍टोबरपर्यंत इच्‍छुक, पात्र विद्यार्थ्यांना दहावी, बारावीकरीता अर्ज करता येईल. शुल्‍क भरण्यासाठी २८ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल. संपर्क केंद्र शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबत पोचपावतीची एक प्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे २ नोव्‍हेंबरपर्यंत सादर करायची आहे.

loading image
go to top