
नाशिक : पोलाद टीएमटी बार’च्या उद्योजकांकडे कोट्यवधींचे घबाड
नाशिक : प्राप्तिकर विभागाने राज्यातील पोलाद ‘टीएमटी बार’च्या निर्मितीतील दोन प्रमुख उद्योजकांवर छापे टाकत बेहिशोबी रोकड, सोन्याचे दागिने असा कोट्यवधींचा ऐवज जप्त केला आहे. प्राप्तिकर विभागाने जालनासह औरंगाबाद, नाशिक, मुंबई, कोलकत्यासह ३० हून अधिक ठिकाणी गेल्या ३ ऑगस्ट रोजी छापे टाकून १२० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेसह ५६ कोटींची रोकड व १४ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती आयुक्त सुरभी अहलुवालिया यांनी दिली. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामध्ये महत्त्वाच्या दस्तावेजांसह अनेक संस्थांकडून बोगस खरेदीद्वारे खर्च वाढवून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याची माहिती हाती लागली आहे. कच्च्या मालाचा जास्तीचा साठा, हिशेबाच्या नोंदवह्यांमध्येही मोठी हेराफेरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या कारवाईतून सुमारे १२० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकरच्या हाती लागली आहे.
तसेच, या तपासणीत कोलकाता स्थित शेल कंपन्यांकडून मिळविलेल्या बोगस असुरक्षित कर्जे आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातूनही बेहिशोबी उत्पन्न जमा केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या पथकाला मोठ्या प्रमाणात लॉकर्स सापडले आहेत. हे लॉकर्स हे कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने उघडण्यात आले होते, ज्याची देखभाल सहकारी बँकेकडे होती. शोध मोहिमेदरम्यान सहकारी बँकेतील अनेक लॉकर्ससह तीसहून अधिक बँक लॉकर्सची झडती घेण्यात आली.
या लॉकर्समधून मोठी बेहिशोबी रोकड आणि सोन्याचे दागिने सापडले असून तेही जप्त करण्यात आले आहेत. तसेच, एकाच्या फार्म हाउसवर असलेल्या गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत ५६ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड, आणि १४ कोटींचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याचे अहलुवालिया यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
अधिकारी आले वऱ्हाडी बनून
जालना : वऱ्हाडी असल्याचे भासवून शंभरपेक्षा जास्त वाहनांतून येथील औद्योगिक वसाहतीत आलेल्या नाशिकमधील प्राप्तिकर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्टील कंपन्यांसह अन्य काहींची झाडाझडती घेतली होती. यावेळी छाप्यात सापडलेल्या घबाडाची मोजदाद केल्यावर कोट्यवधींची बेहिशोबी माया उजेडात आली. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईत औरंगाबादेतील एका बांधकाम व्यवसायिकाचे नाव पुढे येत आहे. येथील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपन्या, यासंबंधीच्या काही उद्योजकांची घरे, शहरातील व्यापारी, एका सहकारी बॅंकेवर प्राप्तिकर विभागाने तीन ऑगस्टला झाडाझडती घेतली. शहरातील जिंदमाल मार्केटमधील दुकानाचा तपासणी करून विमलराज संपातराज सिंघवी हे दुकान सील केले होते. काही बड्या स्टील कंपन्यांची कागपत्रांसह एका सहकारी बँकेची तपासणी करण्यात आली होती. ही कारवाई पाच दिवस सुरू होती. मोजदाद केल्यावर तब्बल साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी माया जप्त केल्याचे सांगण्यात येते. त्यात पन्नास कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम, सोन्याचे दागिने, हिऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. चार ते पाच यंत्रे आणून पैसे मोजावे लागले.