Latest Marathi News | पालकमंत्र्यांचा आयुक्तांना 15 दिवसांचा अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse NMC News

Nashik : पालकमंत्र्यांचा आयुक्तांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पाऊस संपल्यानंतर तातडीने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवल्यास कारवाईचा इशारा दिला, तर महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिवाळीनिमित्त मजूर मिळत नसल्याचे कारण देत खड्डे बुजविण्यासंदर्भात चालढकल करत ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे. (15 days ultimatum from guardian minister to NMC commissioner for potholes repair nashik Latest Marathi News)

मागील दोन वर्षात शहरातील रस्त्यांवर साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. नाशिकचे रस्त्यांची चर्चा राज्य पातळीवर झाल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आले. नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्त्यांच्या विषयावर महापालिकेला धारेवर धरत खड्ड्यांबाबत विचारणा केली होती. त्या वेळी पावसाळा संपल्यानंतर तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले होते.

मात्र, मागील पंधरा दिवसात पाऊस न झाल्याने या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई झाली नाही. रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. दिवाळी संपून आठ दिवस उलटत असतानाही महापालिका अजून दिवाळीच्या फीवरमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेलाच अल्टिमेटम दिला आहे. पंधरा दिवसात शहरातील रस्ते पूर्ववत न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Nashik Sports : नाशिकच्या कौसल्येची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खो- खो संघात निवड

बांधकाम विभागाकडून चालढकल

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. आतापर्यंत नऊ हजार खड्डे बुजल्याचा दावा केला, मात्र हा दावा फुसका असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाकडून किमान दोष निवारण कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे.

मजूर मिळत नसल्याने रस्त्यांवरील खड्डे मोजण्यात अडचण येत असल्याचे सांगितले जात असले तरी मात्र हा विषय ठेकेदारांचा आहे. महापालिकेचा नसतानादेखील ठेकेदारांची बाजू घेऊन चालढकल केली जात आहे.

हेही वाचा: Nashik : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवा