Nashik News : जिल्ह्यातील 191 शाळा अंधारात; नांदगाव, येवला तालुक्यांत सर्वाधिक शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Power cut news

Nashik News : जिल्ह्यातील 191 शाळा अंधारात; नांदगाव, येवला तालुक्यांत सर्वाधिक शाळा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शाळांचे डिजिटायझेशन करण्याचा, तर नाशिक जिल्हा परिषदेकडून १०० मॉडेल स्कूलसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १९१ जिल्हा परिषदांचा शाळा विजेअभावी अंधारात असल्याचे समोर आले आहे.

यात काही शाळांना अद्याप वीजपुरवठा पोचलेला नाही, तर काही शाळांची थकीत वीजबिलापोटी वीजजोडणी खंडित केली आहे. तालुकानिहाय विचार करता नांदगाव व येवला तालुक्यांतील सर्वाधिक शाळांचा यात समावेश आहे. (191 schools in district electricity issues maximum number in Nandgaon yeola taluka Nashik News)

विशेष म्हणजे सुरगाणा व पेठ तालुक्यांतील एकही शाळा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान विद्यार्थी शिकणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या तीन हजार २६६ शाळा असून, यात दोन लाख ७८ हजार ३३७ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहे. त्यांना दहा हजार ६०४ शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहे. दर वर्षी शिक्षण समितीअंतर्गत शाळा दुरुस्त्या केल्या जातात. तसेच, नावीन्यपूर्ण योजनेतून शाळांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणकदेखील पुरविण्यात आले. आता तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून १०० मॉडेल स्कूल योजना राबविली जात आहे. यासाठी खास तरतूददेखील करण्यात आली आहे. एका बाजूला शाळांचे असे चित्र रंगविले जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील शाळांना वीजजोडणी नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

राज्यातील नऊ हजार २६२ शाळा विजेअभावी अंधारात असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शाळांची माहिती घेतली असता तब्बल १९१ शाळा विजेअभावी अंधारात असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील काही बहुतांश शाळांचे थकीत बिलापोटी वीजजोडणी तोडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Nashik News : ढिलाई जिल्हा परिषद बांधकामची अन् भुर्दंड मात्र ठेकेदाराला!

विजेची साधनसामग्री उभारण्यासाठी वा वीजजोडणी करण्यासाठी शाळांना शासनाकडून निधी मिळत असला तरी महिन्याला येणाऱ्या विजेचे बिल भरण्यासाठी शासनाकडून विशेष अनुदान मिळत नाही. त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या सादिल अनुदानातून वीजबिलाचा भरणा करावा लागतो.

शाळांचे शालेय साहित्य, स्वच्छता व इतर गोष्टीसाठी सादिल अनुदान दिले जाते. वीजबिल भरण्यासाठी शाळांना कोणतेही स्वतंत्र अनुदान दिले जात नाही, तर काही शाळांना अद्याप वीजजोडणी देखील पोचली नसल्याचे बोलले जात आहे.

थकबाकीचे प्रमाण मोठे

जिल्हा परिषद शाळांना सादिल अनुदानापोटी निधी मिळतो. यातूनच शाळा व्यवस्थापनाने वीजबिल अदा करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक शाळांचे वीजबिल थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे प्राप्त अनुदानातून बिल भरणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय वीज नसलेल्या शाळा अशा ः

बागलाण (१८), चांदवड (६), देवळा (१३), दिंडोरी (८), इगतपुरी (७), कळवण (१८), मालेगाव (१७), नांदगाव (४५), नाशिक (२), निफाड (७), सिन्नर (२), त्र्यंबकेश्वर (१४), येवला (३४) एकूण (१९१ शाळा)

हेही वाचा: Breaking News : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन