
UPSC Exam: ‘यूपीएससी’ला 38 टक्के उमेदवारांची दांडी!
UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता. २८) झालेल्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षेला येथील १९ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये तीन हजार ८८७ उमेदवारांनी हजेरी लावली. तर तब्बल दोन हजार ४४५ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली असून, गैरहजेरीचे प्रमाण ३८.६१ टक्के राहिले. (38 percent of candidates absent for UPSC exam nashik news)
कोरोना महामारीनंतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पूर्वपदावर येत असून, नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होऊ लागल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये सुसूत्रता आलेली आहे.
यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी नागरी सेवा (पूर्व) २०२३ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नाशिक शहरातील १९ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एकूण सहा हजार ३३२ परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे जाणार होते.
दोन सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेतील सकाळच्या सत्रात तीन हजार ९१८ परीक्षार्थी हजर होते, तर दोन हजार ४१४ उमेदवारांनी दांडी मारली. दुपारच्या सत्रात उपस्थितीच्या प्रमाणात आणखी घट होऊन तीन हजार ८८७ परीक्षार्थ्यांनी हजेरी लावली, तर दोन हजार ४४५ परीक्षार्थी गैरहजर होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तीन केंद्रांवर सर्वाधिक गैरहजेरी
सर्वच केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात उमेदवार गैरहजर होते. परंतु त्यातही तीन केंद्रांवर अनुपस्थितीचे प्रमाण अधिक राहिले.
यामध्ये आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, कॉलेज रोडवरील एचपीटी व आरवायके महाविद्यालय आणि गंगापूर रोडवरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय या केंद्रांवर गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय राहिली.
काठिण्य पातळी संमिश्र
परीक्षेच्या काठिण्य पातळीबाबत संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. त्यातही विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी आदी शाखांतील उमेदवारांना परीक्षा अन्य उमेदवारांच्या तुलनेत सोपी गेल्याचे सांगण्यात आले. आता या परीक्षेच्या माध्यमातून मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.