
डिझेल तुटवड्याचे संकट कायम
नाशिक : पेट्रोलियम कंपन्यांकडून मर्यादित पुरवठा होत असल्याने शहरासह जिल्हाभरातील पेट्रोलपंप कोरडे पडू लागले आहेत. बुधवारी (ता.१) शहरासह जिल्हाभरातील सुमारे 40 टक्के पंप इंधन उपलब्धतेअभावी बंद पडले होते. डिझेलचा तुटवडा कायम असून पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या आठवड्याभरात हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी खरेदी बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे काल (ता.३१) पंपचालकांकडून इंधन खरेदी करण्यात आली नव्हती. पंपावर उपलब्ध असलेल्या इंधनाची विक्री करण्यात आली. नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याने पंपांबाहेर मोठ्या रांगा बघायला मिळाल्या होत्या. बुधवारी कंपन्यांकडून इंधन पुरवठा करण्यात आल्याने इंधन टंचाईची तीव्रता घटलेली होती. असे असले तरी शहरासह जिल्हाभरातील बहुतांश बीपीसीएल कंपनीचे पेट्रोलपंप बंद राहिले. कंपनीकडून मागणीइतका पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे पंपचालकांकडून सांगण्यात येत आहे. अशात बीपीसीएलचे बहुतांश पंप बंद असून, काही पंपांवर गेल्या शुक्रवारपासून डिझेल उपलब्ध नाही. येत्या काही दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. डिझेलचा तुटवडा गंभीर होऊ शकतो, असे पंपचालकांचे म्हणणे आहे.
दहा लाख लिटर डिझेलची जिल्ह्याला रोजची आवश्यकता
नाशिक शहरातील नव्वद पेट्रोलपंपांसह संपूर्ण जिल्हाभरात सुमारे साडे चारशे पंप आहेत. प्रत्येक पंपावर रोज सुमारे अडीच ते तीन हजार लिटर डिझेलची विक्री होत असते. अशा परिस्थितीत जिल्ह्यात रोज सुमारे दहा लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असते. त्या तुलनेत पुरवठा निम्मा होत असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काही दिवसांत डिझेल टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांना दिलासा कायम; जाणून घ्या आजची किंमत
शासकीय यंत्रणेला कंपन्यांचा प्रतिसाद नाही
दरम्यान इंधन तुटवड्यासंदर्भात पंपचालक जिल्हा प्रशासनाच्याही संपर्कात आहे. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पेट्रोलियम कंपनी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रशासकीय भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे.
हेही वाचा: Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?
Web Title: 40 Petrol Pumps Shut Down Due To Unavailability Of Fuel Due To Limited Supply From Petroleum Companies In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..