
महिला सबलीकरण जनजागृतीसाठी 6 रणरागीनींची 450 किमी सायकलवारी
वणी (नाशिक) : महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या सहा रणरागिनी महिला सबलीकरणाच्या जनजागृतीसाठी साडे चारशे किलोमीटरच्या प्रवासाला नाशिक येथून निघाल्या आहेत. चार दिवसाच्या या मोहीमेत आज सप्तशृंग गडावर आदिशक्ती सप्तशृंगी देवीसह वेगवेगळ्या सहा देवी मंदीराना भेट देवून महिली सबलीकरणा विषयी जनजागृती करणार आहे.
नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनिषा रौंदळ, सौ. माधुरी गडाख, सौ. रोहिणी भामरे, सौ. पुष्पा सिंग, सौ. अनुराधा नडे, प्रियंका देशमुख या महिलांनी, महिलांची महिलांकरिता आयोजित केलेली 450 किमीची 'महिला सबलीकरण मोहिम' या सायकल रॅलीस आज 26 फेब्रुवारी पासून सुरुवात केली. या रॅलीची सांगता 1 मार्च रोजी नाशिक येथे होणार आहे. उपक्रमात सहभागी महिलांनी नियोजनाप्रमाणे तळेगाव, दिंडोरी येथे पथनाट्य सादर करीत राईडचे सकाळी 11 वा. कृष्णगांव येथे आगमन झाले. यावेळी कृष्णगांव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. वणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरास त्यांनी भेट दिली. यावेळी शिबिरातील विद्यार्थीनी व ग्रामस्थांची महिला सबलीकरणाची पथनाट्यातून जनजागृती केली.
हेही वाचा: कुसुमाग्रजांच्या जन्मभूमीच्या प्रवेशद्वारीच मटका जोरात सुरू
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. सुरजकुमार प्रसाद, डॉ. विराम ठाकरे, तनिष्का गटप्रमुख मिनाताई पठाण, दिगंबर पाटोळे, नामदेव पैठणे, विलास ठाकरे, गणेश गांगोडे, भरत पवार, शिवाजी जाधव, संजय गांगोडे, टोपले सर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर सायकलिस्ट महिलांनी सप्तशृंगी गडाकडे प्रस्थान केले. दुपारी सुमारे 10 किमीचा नांदुरी ते सप्तशृंगीगड घाट चढत सहभागी महिलांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पहिल्या दिवसाचे मुक्काम स्थळ असलेले देवळा येथे त्या रवाना झाल्या. सदर महिलांची पुढील राईड रेणुका देवी (चांदवड), चंडिका देवी (पाटणादेवी, चाळीसगाव), जगदंबा माता (कोटमगाव, येवला) व शेवटी कालिका माता नाशिक अशी असणार असून महाशिवरात्रीच्या दिवशी (1 मार्च) दुपारी एक वाजता मोहिमेची सांगता होईल.
हेही वाचा: शिवसेनेची मुसंडी आणि भाजपची व्यूहरचना
''महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्यावतीने महिलांनी महिलांची महिलांसाठी आयोजित केलेली ही महिला सक्षमीकरण सायकल राईड आज मोठ्या उत्साहात सुरू झाली. महिला हे देवीचे रूप मानलं जातं या अनुषंगाने या विशेष मोहिमेत आम्ही सहा देवी मंदीरांना भेट देवून दर्शन घेणार आहोत. आमचे ठिकठिकाणी स्वागत होत असून प्रबोधनात्मक पथनाट्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.'' - डॉ. मनिषा रौंदळ, राईड कॉर्डिनेटर
Web Title: 450 Km Cycling Of 6 Women For Women Empowerment Awareness
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..