
नाशिक : मालमत्ता धारकांना एप्रिल अखेरपर्यंत 5 टक्यांची सूट
नाशिक : महापालिका प्रशासनातर्फे मालमत्ता धारकांना (Property Owners) एमएमएसद्वारे (SMS) मालमत्ता कराची (Property Tax) मागणी कळविण्यात आलेली आहे. याअंतर्गत एप्रिल अखेरीपर्यंत कर अदा करणाऱ्यांना ५ टक्यांची सूट जाहीर केलेली आहे. या सुटीचा लाभ घेताना योजनेला करदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर दुसरीकडे करापोटी महापालिकेला (NMC) सतरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
२०२२-२३ या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराची देयके ऑनलाइन (Online) पद्धतीने संकेतस्थळावर (Website) भरण्याची सुविधा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच करदात्यांना यासंदर्भात मालमत्ता कराची मागणी एसएमएसद्वारे कळविलेले आहे. आत्तापर्यंत ३४ हजार ८६० मिळकतधारकांनी एप्रिलमध्ये देऊ केलेल्या ५ टक्के सवलतीचा लाभ प्राप्त करून घेतला आहे. दुसरीकडे या मिळकतधारकांकडून महापालिकेला १७ कोटी एक लाख रुपयांची वसुली झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ कोटी ५४ लाख रुपयांची वाढ झालेली आहे. मिळकतधारकांना www.nmctax.in किंवा www.nmc.gov.in या संकेतस्थळाला भेट देत रक्कम अदा करताना कर सवलतीचा (Discount) लाभ घेता येणार आहे. एप्रिलमध्ये दिलेल्या ५ टक्के सवलतीचा मिळकतधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा: नाशिक : 'महिला' अत्याचारांची संख्या घटेना
पाणीपट्टी वसुलीत 2 कोटींची वाढ
दरम्यान मालमत्ता कराप्रमाणे पाणीपट्टी वसुलीतही वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी दोन कोटी २६ लाख रुपये पाणीपट्टीच्या (Water bill) माध्यमातून महापालिकेला प्राप्त झालेले होते. यावर्षी चार कोटी ३० लाख रुपये रक्कम महापालिका तिजोरीत पाणीपट्टीच्या पोटी संकलित झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीपट्टीत दोन कोटींची वाढ झालेली आहे.
हेही वाचा: राज्यामध्ये आठवड्यात ५५ टँकरची वाढ
Web Title: 5 Percent Discount For Property Owners Till End Of April Nashik Nmc News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..