मुख्य अंक पान ५ अँकर
चिमुकल्या स्पंदनने दिला माणुसकीचा हात!
स्वतःच्या बचतीतील १ हजार ६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : पिग्मी बँकेत जमा होणारे प्रत्येक नाणे आणि प्रत्येक रुपया स्पंदनसाठी एखादे छोटे स्वप्न पूर्ण करण्याची पुंजी होती. कधी आवडीची वस्तू घ्यायची, तर कधी मनासारखी एखादी गोष्ट खरेदी करायची... अशा अनेक इच्छा त्या छोट्याशा बचतीशी जोडलेल्या असतील. मात्र, सात वर्षांच्या स्पंदन अर्चना हेमंत सोनार याने या बचतीकडे स्वतःच्या इच्छांपेक्षा समाजाच्या गरजांच्या नजरेतून पाहिले आणि आपली संपूर्ण साठवलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला.
नाशिकमधील जत्रा हॉटेल परिसरात राहणाऱ्या स्पंदनने आपल्या पिग्मी बँकेत साठवलेले १ हजार ६०० रुपये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे, महसूल चिटणीस आबासाहेब तांबे आणि स्पंदनचे पालक उपस्थित होते.
एरवी लहान मुलांसाठी पिग्मी बँक म्हणजे खाऊचे पैसे साठवण्याचे, आवडीच्या वस्तू घेण्यासाठी बचत करण्याचे एक साधन असते. मात्र, स्पंदनने या वयातच आपल्या बचतीचा उपयोग गरजूंच्या मदतीसाठी करण्याचे ठरवले. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून समाजहिताला प्राधान्य देण्याची त्याची ही कृती विशेष लक्षवेधी ठरली आहे.
स्पंदनने दिलेली १ हजार ६०० रुपयांची रक्कम आकड्यांच्या दृष्टीने छोटी असली, तरी त्यामागची भावना मोठी आहे. मदत करण्यासाठी वय, श्रीमंती किंवा मोठ्या आर्थिक क्षमतेची गरज नसते, तर त्यासाठी मनात संवेदनशीलता आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असावी लागते, हे स्पंदनने कृतीतून दाखवून दिले.
कोट
स्पंदनची एवढ्या लहान वयात समाजाप्रति असलेली जाणीव आणि मदतीची भावना निश्चितच प्रेरणादायी आहे. स्वतःच्या छोट्या स्वप्नांसाठी साठवलेली पुंजी दुसऱ्यांच्या मदतीसाठी देणाऱ्या स्पंदनने एका गोष्टीची जाणीव करून दिली आहे... माणुसकीचे मोल रकमेवर नाही, तर मदतीमागच्या भावनेवर ठरते.!
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
फोटो क्रमांक :- एच-35336