Nashik News : 9 हजार आशा सेविकांना वाढीव मानधनाचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi workers

Nashik News : 9 हजार आशा सेविकांना वाढीव मानधनाचा लाभ

नाशिक : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी (Anganwadi) सेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू होती. (9 thousand Asha Sevika have benefit from increased remuneration nashik news)

बुधवारी (ता. ८) मुंबईत आझाद मैदानावर निर्देशने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा केली.

जिल्ह्यातील चार हजार ५२४ अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडीतील ४९० सेविका, तर ३ हजार ९४४ मदतनीस यांना या वाढीव मानधनाचा लाभ होणार आहे. या संदर्भातील विविध आंदोलनांची दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. पी. एम. पाडवी यांच्याशी झालेल्या चर्चेत, आशा व गट प्रवर्तकांना १५०० रूपये वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार गुरूवारी (ता. ९) अर्थसंकल्पात आशा स्वयंसेविकांचे मानधन ३ हजार ५०० वरून पाच हजार रूपये, गटप्रवर्तकांचे मानधन ४ हजार ७०० वरून सहा हजार २०० रूपये, अंगणवाडी सेविकांचे मानधन आठ हजार ३२५ वरून दहा हजार रूपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन पाच हजार ९७५ वरून सात हजार २०० रूपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन चार हजार ४२५ वरून पाच हजार ५०० रूपये करण्याची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्याचप्रमाणे अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची वीस हजार पदे भरणार असल्याचे, तसेच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली आणली जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

२८ ला देशव्यापी मोर्चा

दरम्यान, याबाबत महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले म्हणाले की, शासनाने केलेली वाढ तुटपुंजी आहे. कारण घरगुती गॅसची किंमत १२०० रूपये झाली आहे.

आशा व गट प्रवर्तकांना शासनाने २४ हजार रुपये किमान वेतन द्यावे. गट प्रवर्तकांना २६ हजार रूपये वेगळा प्रवास भत्ता द्यावा, कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन वेतन सुसुत्रीकरणात समावेश करत फरकाची रक्कम द्या यासारख्या मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहील.

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत मोबदला वाढ केलेली नाही. केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांचा किमान वेतन देऊन सन्मान करावा यासाठी येत्या २८ मार्चला दिल्लीत आयटकच्या राष्ट्रीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशनतर्फे देशव्यापी मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikAnganwadi Sevika