फोटो : 32602
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्व माध्यम केंद्राचे उद्घाटन करताना अभय कुलकर्णी.
...
पत्रकारितेने राष्ट्रीय विचारांची जोपासना करावी
अभय कुलकर्णी : सिंहस्थ कुंभपर्व माध्यम केंद्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून, समाजाला योग्य दिशा देण्याचे आणि राष्ट्रहिताची भावना रुजवण्याचे एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजात काम करताना समन्वयवादी दृष्टिकोन ठेवून राष्ट्रीय विचारांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्व संवाद केंद्राचे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केले.
नाशिक येथे आयोजित ''विश्व संवाद केंद्र, सिंहस्थ कुंभपर्व माध्यम केंद्र'' कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. रत्नमनोहर संकुल, अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ, रविवार कारंजा येथे गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर नाशिक विभाग संघचालक (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कैलास साळूंखे, नाशिक शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर, विश्व संवाद केंद्र अध्यक्ष अभय कुलकर्णी व कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते.
आगामी सिंहस्थ कुंभपर्व (नाशिक-त्र्यंबकेश्वर) च्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या कार्यविस्तारामुळे या नवीन स्थायी कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.आपल्या भाषणात अभय कुलकर्णी यांनी पत्रकारितेतील मूल्यांवर भर दिला. ‘सध्याच्या काळात पत्रकारितेचे क्षेत्र वेगाने बदलत असून मूल्यांची आणि नैतिकतेची जपवणूक करणे हे मोठे आव्हान ठरत आहे. पत्रकारांनी आपली वैचारिक आणि सामाजिक नैतिकता ढळू देता कामा नये. सर्वतोपरी राष्ट्रहिताची भावना जोपासून सत्य, तटस्थ आणि विधायक पत्रकारिता केली पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.