esakal | आरोग्य विभागात मनुष्यबळाचा ‘दुष्काळात तेरावा महिना’ निश्‍चित; अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचा तिढा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

आरोग्य विभागात मनुष्यबळाचा ‘दुष्काळात तेरावा महिना’ निश्‍चित

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना महामारीमध्ये आरोग्य विभागात मनुष्यबळ उपलब्धतेची समस्या कायम असताना मेअखेर राज्यातील ३५० अधिकारी निवृत्त होतील. त्यामुळे आरोग्य विभागाची (Health Department) अवस्था ‘दुष्काळात तेरावा महिना‘ या उक्तीगत होणार असल्याची स्थिती दिसते आहे. जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) संवर्गातील अधिकाऱ्यांची ही पदे असून, त्यांचे वय ५८ ते ६२ वर्षे इतके आहे. सरकारने यापूर्वी मुदतवाढ देत असताना ३१ मे २०२१ ही ‘डेडलाइन' ठरवलेली आहे. (About 350 health officials will retire by the end of May In State)

आरोग्य उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ अशा पदांवर हे ज्येष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची झालेली फरफट डोळ्यांपुढे असताना तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणे केंद्र सरकारने आरोग्य सेवासुविधांच्या बळकटीकरणासोबत मनुष्यबळ उपलब्धतेवर भर दिला आहे. अशा परिस्थितीत सध्या कार्यरत असलेल्या मनुष्यबळाला निवृत्त केल्यावर इतक्या मोठ्या पदांचा पडणाऱ्या खड्ड्याचा प्रश्‍न तयार होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे राज्य सरकारला आताच्या मनुष्यबळाला निवृत्त करायचे आणि त्या जागांची कमी कालावधीत पूर्तता कशी करायची इथंपासून ते उपलब्ध मनुष्यबळाच्या सेवेचा कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) ओसरेपर्यंत उपयोग करून घ्यायचा काय इथंपर्यंतच्या प्रश्‍नांचा तिढा सोडवावा लागणार आहे.

नाराजी करावी लागणार दूर

राज्यातील आरोग्य विभागात ज्येष्ठांमुळे पद्दोन्नती मिळत नाही, अशी खदखद अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ज्येष्ठांना कोरोनाच्या तिसरी लाट संपेपर्यंत सेवेत ठेवायचे झाल्यास पद्दोन्नतीच्या टप्प्यात असलेल्या अधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान राज्य सरकारला पेलावे लागणार आहे. एका महापालिकेत ६५ वर्षे वय निवृत्तीचा विचार सुरू झाल्यावर प्रशासनाला इतर अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा: पिंपळगाव बाजार समितीत 45 हजार क्विंटल कांद्याची आवक; 4 कोटींची उलाढाल