esakal | नाशिक : अभिनेता आस्ताद काळेंनी गोदावरीमध्ये मारली डुबकी
sakal

बोलून बातमी शोधा

actor aastad Kale took a dip in the godavari river in nashik

नाशिक : अभिनेता आस्ताद काळेंनी गोदावरीमध्ये मारली डुबकी

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मूळचे पुणेकर अन अभिनयासाठीचे मुंबईकर झालेले अभिनेता आस्ताद काळे (Actor Aastad Kale) यांनी रविवारी (ता.३) सकाळच्या प्रहरी जलालपूरच्या खळखळत्या गोदावरीमध्ये डुबकी मारली. अनेक नाटकांच्या प्रयोगांसाठी नाशिकमध्ये आलेले आणि रसिकांच्या गळ्यात ताईत असलेल्या आस्ताद यांचे नाशिकमध्ये मात्र पहिल्यांदा मालिकेचे चित्रीकरण होत आहे.


अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित यांनी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंच्या नाशिक नगरीमध्ये चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. चित्रीकरणासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीमध्ये चिन्मय हे स्वतः लक्ष घालतात. त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमागून मालिकांचे चित्रीकरणासाठी कलावंत आणि पडद्यामागचे कलाकार मुंबईच्या बाहेर पडताच थेट नाशिक गाठतात. नव्याने सुरु होत असलेल्या एका दूरचित्रवाहिनीच्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी आस्ताद, अभिनेत्री रुजुता देशमुख, अभिनेत्री शर्वरी जोग, अभिनेत्री शुभा गोडबोले, निर्मात्या डी. श्‍वेता आणि त्यांची ‘टीम' नाशिकमध्ये दाखल झाली. गोदावरीमध्ये डुबकीने ‘एंट्री‘ आणि धार्मिक विधीचे चित्रीकरण ऐतिहासिक जलालपूर च्या घाटावर झाले. गोदावरीमध्ये पाय सोडून बसलेली अभिनेत्री, जलालपूरच्या मंदिरातून बाहेर येणारी अभिनेत्री अशी दृश्‍ये चित्रित करण्यात आली आहेत.


जलालपूरकरांकडून स्वागत

मालिकेच्या चित्रीकरणासाठी आलेल्या मराठी कलावंतांचे स्वागत जलालपूर ग्रामस्थांतर्फे करण्यात आले. सरपंच हिराबाई गभाले यांनी आस्ताद, रुजुता, शर्वरी, शुभा यांचा सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य भगवान गभाले, ग्रामसेवक दिनेश पाटील हे उपस्थित होते. जलालपूरची ऐतिहासिक माहिती आणि झालेल्या विकास कामांबद्दल श्री. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जलालपूरमध्ये पेशवेकालीन कारंजे आणि मंदिर आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचे माहेर म्हणूनही जलालपूरची ओळख आहे. पेशवेकालीन कारंजे पुन्हा उभे करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे.

आस्ताद रमले आठवणींमध्ये

आस्ताद हे नाटकांच्या प्रयोगासाठी अनेकदा नाशिकमध्ये आले आहेत. महाकवी कालिदास कलामंदिराप्रमाणेच परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील प्रयोगांच्या आठवणींमध्ये ते रमले होते. गोदावरीचा अनमोल ठेवा नाशिककरांना मिळाला असल्याचा आनंदभाव व्यक्त करत असताना आस्तादने गोदावरीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच जगभरातील पाण्याच्या भीषण टंचाईचे दाखले देत असताना पाण्याच्या वणव्याचे चटके चेन्नईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

loading image
go to top