Latest Marathi News | Adimaya- Adishakti : एकमेव दक्षिणाभिमुखी कालिकादेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalikadevi Temple at nashik

Adimaya- Adishakti : एकमेव दक्षिणाभिमुखी कालिकादेवी

षष्‍ठी नवदुर्गा माता कात्‍यायनी

कंचनाभां कराभयंपदमधरामुकुटोज्वलां ।
स्‍मेरमुखीशिवपत्‍नीकात्‍यायनसुतेनमोअस्‍तुते ।।


नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात पुरातन काळापासून सुमारे ३५० ते ४०० वर्षांपासून स्‍थित असे नवी तांबट आळी येथील दक्षिणाभिमुखी असलेले श्री कालिकादेवी मंदिर. श्री कालिकादेवी तांबट कंसारा समाजाची कुलदेवी आहे.

दक्षिणाभिमुखी असणारे श्री कालिकादेवीचे हे एकमेव मंदिर असल्याने अनन्यसाधारण महत्त्व आहे. तांबट कंसारा हे कालिकादेवीचे निस्सीम उपासक आहे. ही देवी कंसारा कालिकादेवी म्‍हणूनही प्रसिद्ध आहे. (Adimaya Adishakti Navratri 2022 only south facing goddess Kalika devi temple at Nashik Latest Marathi News)

आख्यायिका

मंदिराच्या मागे पूर्वी असलेल्या विहिरीतून उत्खननात देवीची मूर्ती सापडली असून, स्वयंभू आहे. देवीची मूर्ती दक्षिणाभिमुखी असून, उभी व चतुर्भुज आहे. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात पात्र असून, चौथ्या हातात डमरू धारण केलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. साधारण अडीच ते तीन फूट उंचीची आहे. ही देवी कुमारिका स्वरूपात आहे. देवीच्या मस्तकावर पंचमुखी नागाचे छत्र आहे.

देवीच्या पायाशी चंद्रसेन, रुद्रसेन व भद्रसेन या तीन वीर पुरुषांचे मस्तके आहेत. चौथ्या वीर पुरुषाचे नाव वीरसेन असे आहे. वीरसेनास कालिकादेवीने अभय दिले. समोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची बैठी मूर्ती आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप हा लाकडी असून, पेशवेकालीन आहे. लाकडी महिरपीवरचे नक्षीकाम अतिपुरातन काळातील स्थापत्य कलेची साक्ष देते. मंदिरातील पितळेच्या मोठ्या घंटेवर शके १७८६ असा उल्लेख आढळतो.

हेही वाचा: Chakra Puja : प्रतीकांच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूपतेची पूजा

मंदिरात शिसव लाकडापासून बनवलेला, अतिशय सुंदर नक्षीकाम व कलाकुसर केलेला अष्टकोनी फिरता गरबा आहे. दसऱ्याच्या दिवशी ६४ योगिनींचे कडकण्यांचे रूपात (खाजेले) पूजा केली जाते.

महारत्नदीप पूजेच्या मानकऱ्याची निवड कुटुंबप्रमुखांमधून चिठ्ठीद्वारे होते. यात पाच ते सहा किलो गव्हाच्या कणकेपासून दिव्याची नक्षीदार प्रतिकृती बनविण्यात येते व त्याद्वारे देवीची पूजा करण्यात येते. हा महारत्‍नदीप मानकऱ्याकडे वाजतगाजत शोभायात्रा काढून नेला जातो. महारत्नदीप घरी येणे हे शुभ संकेत आणि कालिकामातेचा आशीर्वाद मानला जातो.

"मंदिरातील चौरंग, गरबा हे अतिशय सुरेख असे नक्षीकाम केलेले पुरातन वस्‍तू आहेत. महारत्‍नदीपाला विशेष महत्त्व असून, त्‍याच्‍या सेवेसाठी अनेक भक्‍तगण आतुरतेने वाट पाहात असतात. महारत्‍नादीपाचे मानकरीकडून प्रसाद स्‍वरूपात (लाडू) रूपांतर करून समस्‍त बांधवांना वाटप केले जाते."
-निरंजन राघोभाई तांबट, अध्यक्ष, समस्त कंसारा मंडळी, श्री कालिकादेवी मंदिर

हेही वाचा: गरबाचा जल्लोष, Bollywoodची क्रेझ अन् नटुन-थटुन तरूणाई मैदानात