धुळे : टुडे पान ४ वर ॲंकर ..............नाव शाईराम....असेच आहे.....
--
साक्री कृषी बाजार समिती सचिवांची पदावनती
--
सभापतींची माहिती : पोलिस चौकशीत प्रोसेडींग बुक आढळले कपाटातच
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ४ : येथील बाजार समितीचे सचिव भूषण कैलास बच्छाव यांच्यावर प्रशासकीय कामकाजातील मनमानी, नियमांच्या उल्लंघनामुळे संचालक मंडळाने पदावनती केल्याची माहिती सभापती ऋतुराज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात बाजार समितीच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या विविध प्रश्नांचे निरसन सभापती ठाकरे यांनी केले.
सभापती ठाकरे म्हणाले, की ४ जून २०२५ पासून कामकाज पाहत असताना सचिव बच्छाव हे बाजार समितीच्या निर्णयांविरुद्ध वागत होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात २४ एप्रिलला झालेल्या माथाडी सभेच्या इतिवृत्तातही त्यांच्या प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले होते व संचालक मंडळाला कारवाईचे निर्देश दिले होते. वारंवार समज देऊनही प्रशासकीय कामकाजात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे २४ ऑक्टोबरला घेतलेल्या विशेष सभेत उपस्थित संचालकांच्या सर्वसंमतीने बच्छाव यांना सचिव पदावरून वरिष्ठ लिपिक पदावर पदावनत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यांच्या जागी विशाल भालचंद्र देसले यांची प्रभारी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. पिंपळनेर येथे व्यापारी संकुल (शॉप्स कम गोडावून) उभारण्याच्या विषयावर पाच ऑगस्टला झालेल्या सभेचे अजेंडे सर्व संचालकांपर्यंत न पोहोचवता कार्यालयातच ठेवून त्यांनी प्रशासकीय आदेशांचा अवमान केला. तसेच, तीन ऑक्टोबरच्या मासिक सभेत अधिकाराचा गैरवापर करून, सभापतींच्या परवानगीशिवाय प्रोसेडींग बुकात विषय ‘तहकूब’ असे स्वतःहून लिहून घेतले, असे गंभीर आरोप सभापती ठाकरे यांनी केले.
-
प्रोसेडींग बुक कार्यालयात
पदावनतीची कारवाई झाल्यानंतर सचिव बच्छाव यांनी सभेतून अर्धवट निघून जात २७ ऑक्टोबरला सभापतींविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात सभापतींनी प्रोसेडींग बुक नेल्याचे नमूद केले होते. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. मुठे यांनी बाजार समिती कार्यालयात प्रत्यक्षात चौकशी केली असता प्रोसेडींग बुक कार्यालयातील कपाटातच सुस्थितीत आढळले. त्यामुळे पोलिसांनी चौकशीअंती लेखी समजपत्र देऊन ही तक्रार निकाली काढल्याचे सभापती ठाकरे यांनी सांगितले. पदावनतीबाबत खुलासा मागवूनही सचिव बच्छाव यांनी कोणताही लेखी खुलासा सादर केला नाही आणि आजतागायत प्रभारी सचिव विशाल देसले यांच्याकडे सचिव पदाचा कार्यभारसुध्दा सुपूर्द केलेला नाही. या सर्व कारवाईची माहिती पणन संचालक (पुणे), जिल्हा उपनिबंधक (धुळे) आणि सहायक निबंधक (साक्री) यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठवण्यात आल्याचे सभापती ठाकरे यांनी सांगितले. संचालक दीपक साळुंखे, जितेंद्र बिरारीस, किरण कोठावदे, वसंत पवार, दिनकर बागूल, भास्कर पवार, ओंकार राऊत, शाईराम अहिरे, जिजाबाई साबळे उपस्थित होते.