पान-२
-----------
३६-२
राज्यातील नऊ कृषी तज्ज्ञांसह
शेतकऱ्यांना कृषी सेवा पुरस्कार
-----------
सोनोशी येथे १२ ला वितरण होणार
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : शेती आणि कृषी संशोधनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नऊ कृषी तज्ज्ञ व प्रगतशील शेतकऱ्यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘कृषी विज्ञान सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.
(स्व) कारभारी गिते यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (ता.१२) सकाळी साडेनऊला सोनोशी येथे हे पुरस्कार प्रदान केले जातील. शेती संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या विजेत्यांमध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. टी. पाटील, कृषी शिक्षण परिषदेचे डॉ. किशोर शिंदे, नाशिकच्या के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. तुषार उगले, संगमनेरच्या खंडेरायवाडी येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल ढेरंगे, पारनेरच्या सारोळा अडवाई येथील प्रगतशील शेतकरी प्रमिला फंड, पैठणच्या रांजणगाव खुरी येथील प्रगतशील शेतकरी बद्रिनाथ इंदापुरे, अकोले येथील विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात, पंढरपूरच्या कृषी यूट्यूबर पल्लवी बोंगे-इंगोले आणि चांदवडचे हवामानतज्ज्ञ व कृषी सल्लागार दीपक जाधव यांचा समावेश आहे. कार्यक्रमात डॉ. एल. के. गिते यांनी लिहिलेल्या आणि पुणे येथील पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘मातीचा धनी- गोष्ट एका धाडसी बापाची’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. प्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे विशेष व्याख्यान आणि नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशनही याच मंचावर होणार आहे. गिते परिवार, कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान आणि पेन पब्लिशिंग हाउसतर्फे हा कार्यक्रम होणार आहे.
----------------