MSI26B09740
साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता व वाणिज्य क्षेत्राचे भविष्य याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. योगेश तोरवणे.
------------
भविष्यात व्यावसायिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व
डॉ. योगेश तोरवणे : पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २५ : भविष्यात व्यावसायिक क्षेत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘डिजिटल तंत्रज्ञान’ यांची भूमिका अधिकाधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे आकलन, संगणकीय साक्षरता, डिजिटल कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. योगेश तोरवणे यांनी केले.
साक्री येथील विद्या विकास मंडळ संचलित सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व वाणिज्य क्षेत्राचे भविष्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या स्वरूपाची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे, तसेच वाणिज्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व, त्यातून उदयास येणाऱ्या रोजगार व व्यवसायाच्या संधींचा परिचय करून देणे, हा या व्याख्यानाचा प्रमुख उद्देश होता. प्राचार्य डॉ. अनंत पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात वाणिज्य शिक्षणाची व्याप्ती केवळ पारंपरिक अभ्यासक्रमापुरती मर्यादित न ठेवता त्यास आधुनिक संगणकीय ज्ञानाची, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आकलनाची जोड देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील परिवर्तनाकडे सकारात्मक आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. प्रा. परेश तोरवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुभम गौड, प्रा. श्रुती मिश्रा यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.