पान-१ अँकर
फोटो- 10309
पिंपळगाव बसवंत ः ‘लोकनेते अजितदादा पवार’ अभ्यासिकेचे लोकार्पण करताना आमदार दिलीप बनकर, खासदार भास्कर भगरे. शेजारी भास्करराव बनकर, विश्वासराव मोरे आदी.
अभ्यासिकेतून प्रशासकीय अधिकारी घडावेत
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ः अभ्यासिका व विविध विकासकामांचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा,
पिंपळगाव बसवंत, ता. ६ ः शहरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून आमदार दिलीप बनकर यांनी शासनाच्या माध्यमातून अद्ययावत अभ्यासिका उभारली. या ज्ञानमंदिराचे ‘दिवंगत नेते अजित पवार’ असे यथार्थ नामकरण केले आहे. अजित पवार यांचे शिस्तीचे गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाणविल्यास अभ्यासिकेतून प्रशासकीय अधिकारी घडतील, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
आमदार बनकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या अभ्यासिका व विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गिते, माजी सरपंच अलका बनकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की ‘एआय’च्या युगात स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलले असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अद्ययावत राहावे लागत आहे. पुण्यात असताना अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शिस्त अन् वेळेला बांधील असलेले नेते अशी त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती.
आमदार दिलीप बनकर म्हणाले, की भूमिपुत्र म्हणून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे शिवधनुष्य मी उचलले. अभ्यासिका, विश्रामगृह यांसह विविध विकासकामांमुळे नागरिकांना सुविधेबरोबरच शहराच्या वैभवात भर पडणार आहे. पिंपळगावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
खासदार भास्कर भगरे म्हणाले, की आमदार बनकरांच्या प्रयत्नामुळे विकासातून पिंपळगाव शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. आमदार गोकुळ गिते यांनी आमदार बनकर यांच्या विकासाच्या दूरदृष्टीबाबत गौरवोद्गार काढले.
ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांनी आमदार बनकर यांच्या विकासकामाचा गौरव केला. विकासकामाबाबत कोणतेही ठराव अडविले नाही. शहराच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी दिली.
-----
चौकट
जुंगलबंदी रंगली
गेल्या निफाड विधानसभा व पिंपळगाव नगर परिषद निवडणुकीत परस्परांचे मित्र राजकीय शत्रू झाले. पिंपळगाव नगर परिषदेत भाजप-शिवसेनेची सत्ता येऊन राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. तेव्हापासून भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे. विकासकामाच्या ठरावावरून राजकारण रंगले होते. आज अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी नगर परिषदेतील विरोधक व सत्ताधारी एकाच व्यासपीठावर आले. विकासासाठी आनंदी वातावरण ठेवू, अशा आणाभाका घेताना जोरदार जुंगलबंदी रंगली. आमदार गिते यांनी दोन्ही गटाच्या कोपरखळ्यांमध्ये चिमटा काढला. नगर परिषद व आमदार बनकर यांनी विकासाकामांचा बार उडवून देत पिंपळगावकरांना दिवाळी भेट दिली.
--------