अखंड कीर्तन सप्ताहास
बाळद बुद्रुक येथे सुरूवात
सकाळ वृत्तसेवा
पाचोरा, ता. ६ ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथे सोमवारपासून (ता. ५) अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरूवात झाली आहे. १२ ऑक्टोंबरपर्यंत आयोजित या सप्ताहाचे गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी आयोजन केले आहे.
या सप्ताहाची बाळदच्या ग्रामस्थांनी सुरवातीपासूनच जय्यत तयारी केली आहे. या सप्ताहांतर्गत दररोज पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री साडेआठ ते साडेदहा हरी किर्तन असे कार्यक्रम होत आहेत. सोमवारी (ता. ५) भावेश महाराज (विटनेर) यांचे तर मंगळवारी (ता. ६) मुकेश महाराज (आंबा पिंप्री) यांचे कीर्तन झाले. बुधवारी (ता. ७) अष्टीकर बाबा (सौंदाणे), गुरुवारी (ता. ८) मधुकर महाराज (कोपरगाव), शुक्रवारी (ता. ९) योगेश महाराज (धामणगाव), शनिवारी (ता. १०) नामदेव महाराज (माळेगाव), रविवारी (ता. ११) रामचंद्र महाराज (दोंडाईचा) यांचे कीर्तन होईल. सोमवारी (ता. १२) रात्री गोविंद महाराज (पाचोरा) यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची समाप्ती होईल.
यानिमित्ताने सोमवारी (ता. १२) सकाळी ७ ते दुपारी १ दरम्यान गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. संत पूजन व कीर्तनासाठी छबू सोमवंशी, रवींद्र पाटील, बापू पाटील, शिवाजी मोरे, अविनाश पाटील, दिलीप पाटील, दिलीप मोरे, उमेश पाटील, संजय सोमवंशी, रवींद्र सोमवंशी, ज्ञानेश्वर सोमवंशी, नितीन सोमवंशी, ज्ञानेश्वर पाटील, गजानन सोमवंशी, राजेंद्र सोमवंशी, बापू मोरे, प्रदीप सोमवंशी, बापू पाटील, अंबादास सोमवंशी यांचे सहकार्य लाभत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी सप्ताहातील कीर्तनासह दैनंदिन कार्यक्रमांचा लाभ घ्यावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.