MSI26B09814
धुळे : उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देताना अक्कलपाडा धरणग्रस्त.
---------------
अक्कलपाडा क्षेत्रातील विद्युतपंपांची वीज तोडू नये
लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. ३० : अक्कलपाडा मध्यम प्रकल्प क्षेत्रातील व नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या कृषीपंप आणि सिंचन विहिरींचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये, तसेच तो त्वरित पूर्ववत ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, या मागणीचे निवेदन वसमार ग्रामपंचायतीसह अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ऐन दिवाळीच्या काळात महावितरण, प्रशासनाकडून शेती तसेच नदीकाठावरील सिंचन विहिरींचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामासाठी थोडा आधार मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. भूसंपादन व पुनर्वसन कायदे आणि नियमानुसार धरणग्रस्त व बाधित गावांसाठी (वसमार, सय्यदनगर, तामसवाडी) राखीव असलेल्या ५ टक्के जलसाठ्यातून सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपसा करण्याची पूर्ववत परवानगी कायम ठेवावी. धरणक्षेत्र व परिसरात वाफेचे (बाष्पीभवनाचे) प्रमाण जास्त असल्याने हे पाणी वाया जाण्याऐवजी शेतकऱ्यांना, पशुधनाला चारा, पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या केल्या आहेत.
या वेळी अक्कलपाडा कृती समितीचे अध्यक्ष गिरीश नेरकर, भरत नेरे, श्रीराम कर्वे, गुलाब चव्हाण, वसमारचे सरपंच समाधान येळीस, जयवंत सासके व ग्रामस्थ उपस्थित होते.