दिवाळी अंक लेख
------
NSK26H31935
अमळनेर : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात स्थित संत श्री सखाराम महाराज संस्थान..
----
NSK26H31936
श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती पू. प्रसाद महाराज.
------
NSK26H31940 (आर.जे. पाटील)
--------
खानदेशचे सांस्कृतिक वैभव
-------------------------
श्री सखाराम महाराज संस्थान
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे खानदेशातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. खानदेशच्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासात आणि अमळनेर तालुक्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचा व त्यांच्या संत परंपरेचा मोठा वाटा आहे. अमळनेर तालुक्याच्या सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनाला वाडी संस्थानामुळे गती मिळालेली आहे.
- आर.जे. पाटील, अमळनेर
अमळनेर येथील वाडी संस्थानाच्या गादीवर प. पू.संत सखाराम महाराज अंदाजे १७८० मध्ये विराजमान झाले. आज त्यांच्याच नावाने संस्थान ओळखले जाते.संत सखाराम महाराजांची पांडुरंग भक्ती,निस्वार्थ सेवा यांच्या गोष्टी आजही ऐकायला मिळतात.त्यांच्यानंतर गोविंद महाराज, बाळकृष्ण महाराज, प्रल्हाद महाराज, तुकाराम महाराज, कृष्णा महाराज, बाळकृष्ण महाराज (आंधळे), वासुदेव महाराज , पुरुषोत्तम महाराज, ज्ञानेश्वर महाराज व त्यानंतर ज्यांनी आजही ही संत परंपरा अबाधित ठेवली आहे ते प्रसाद महाराज. वर्तमानात प्रसाद महाराज हे ११ वे गादीपुरुष म्हणून संस्थानाचे कामकाज पाहत आहेत. प्रसाद महाराजांच्या काळात वाडी संस्थानाचा विकासावर भर देण्यात आला असून संस्थानाचा द्विशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यात्रोत्सव, रथोत्सव, पालखी उत्सव
श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ दरवर्षी अक्षय तृतीयेला होते. त्यादिवशी बोरी नदीच्या वाळवंटात संत सखाराम महाराजांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते, त्यानंतर भव्य अशा यात्रोत्सवाला सुरवात होते. खानदेशातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून यात्रेकडे पहिले जाते. संपूर्ण राज्यभरातून भाविक यावेळी अमळनेरात येत असतात. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या एकादशीला सुमारे २५० वर्षाची परंपरा लाभलेला संत सखाराम महाराजांचा भव्य रथोत्सव पार पडतो. या रथोत्सवात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत असून बेलदार या मुस्लिम समाजाच्या कुटुंबातील व्यक्तीला रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान देण्यात येतो.
रथामध्ये संत सखाराम महाराजांचा मुखवटा, पादुका, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम महाराजांची प्रतीके तसेच गरुड, हनुमान, नगारखाना, घोडेस्वार मशालधारी, भालदार चोपदार यांचा सहभाग असतो. मोहन बेलापूरकर महाराज यांची दिंडी रथाच्या पुढे चालत असते. काही अंतर रथ भाविकांच्या मदतीने दोराने ओढला जातो त्यानंतर मात्र ट्रॅक्टरच्या साहाय्याने मिरवणूक पुढे नेण्यात येते. या वेळी शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. रात्रभर चालणारी मिरवणूक शहरातील वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पूल, पैलाड मार्गे सकाळी सहा वाजता पुन्हा वाडी परिसरात आणली जाते. रथाच्या मागे प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत असतात हे भाविकांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र ठरते. वाडी संस्थानाचे दहावे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली आहे.
अमळनेर येथे देखील संस्थानातर्फे ३३ वर्षापासून वेद पाठशाळा व वारकरी पाठशाळा चालवली जाते. यात जवळपास ५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. यात विद्यार्थ्यांचा सर्वच खर्च संस्था करत असते. संस्थानाचे अमळनेर,पंढरपूर व पैठण येथे सर्व सुविधायुक्त भक्त निवास आहेत तर आळंदी व त्र्यंबकेश्वर येथे भक्त निवास उभारण्याची तयारी सुरू आहे. अमळनेर येथील वाडी संस्थानाचा मागील काही काळापासून कायापालट सुरू असून विकासाच्या एका नव्या अध्यायाला जणू सुरवात झालेली आहे.
---------