विनापरवाना उपोषण करणे भोवले
अमळनेरच्या आंदोलकावर जळगावात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : पोलिसांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, पूर्वकल्पना न देताच शासकीय कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अमळनेरच्या एका अंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप हरकचंद जैन (रा. सुदीप कॉम्प्लेक्स, न्यू प्लॉट, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकाचे नाव आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहरातील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (मेन गेट) गुरुवारी (ता.१२) दुपारी १२ वाजेपासून दिलीप जैन उपोषणाला बसले होते. त्यांनी या आंदोलनासाठी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती.
या प्रकारामुळे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन व भंग झाल्याप्रकरणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सचिन सुरेश महाजन (वय २६, रा. वाघ नगर, जळगाव) यांनी तक्रार दिल्यावरुन शुक्रवारी (ता. १३) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अद्याप आंदोलकास अटक करण्यात आलेली नसून, तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहेत.