अंबड परिसरातील १० कंपन्यांवर कारवाई
---
भूजल प्रदूषणामुळे नागरिकांना कर्करोगजन्य क्रोमियमचा धोका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : अंबड येथील दत्तनगर परिसरातील कूपनलिकांमधून येणाऱ्या रसायनयुक्त पिवळ्या पाण्यात कर्करोगजन्य क्रोमियम हेक्साव्हॅलेंटचे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा तब्बल हजारपट अधिक आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्रतिलिटर ०.०५ मिलिग्रॅम अपेक्षित असताना तब्बल ५०.३ मिलिग्रॅम क्रोमियम आढळल्याची माहिती समोर आली. या दूषित पाण्यामुळे परिसरातील सुमारे २५ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी आवाज उठविल्यावर प्रशासनाने परिसरातील ५० हून अधिक उद्योगांची तपासणी केली असून, दहाहून अधिक उद्योगांवर कारवाई केली आहे. या गंभीर प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.
दत्तनगर परिसरात कूपनलिकांमधून येणाऱ्या पिवळ्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पाण्याच्या संपर्कामुळे काही नागरिकांना त्वचेचे विकार जडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले. आतापर्यंत १९ रहिवाशांना त्वचेचे विकार झाल्याची नोंद आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्रोत शोधून दूषित पाण्याचा प्रवाह रोखण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी या समस्येला वाचा फोडल्यावर प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे.
परिसरातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांच्या अहवालात क्रोमियमचे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा हजारपट अधिक असल्याचे आढळल्याची माहिती आहे. क्रोमियम हेक्साव्हॅलेंट हे कर्करोगाचा धोका वाढविणारे घातक रसायन असल्याने या निष्कर्षाने चिंतेत भर पडली. दूषित पाण्याचा दीर्घकाळ संपर्क आल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दत्तनगर आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे.
५० हून अधिक उद्योगांची झाडाझडती
दत्तनगरसह अंबड औद्योगिक परिसरात दूषित पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी प्रशासनाने शोधमोहीम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत ५० हून अधिक उद्योगांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (ईटीपी) बंद असणे तसेच आवश्यक तांत्रिक नियमांचे पालन न करणे यांसारख्या बाबी आढळलेल्या दहाहून अधिक उद्योगांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही उद्योगांना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, काही उद्योग ‘सील’ करण्यात आले आहेत. परिसरातील दूषित पाण्याचे स्रोत शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली.
कूपनलिका ‘सील’ करण्याच्या सूचना
दत्तनगर परिसरातील नागरिकांना दूषित पाण्यापासून धोका निर्माण झाल्याने तातडीच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर दिला आहे. परिसरातील अनधिकृत जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांसह पावसाळी पाण्याच्या नाल्यांची तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मार्गांद्वारे प्रक्रिया न केलेले दूषित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे प्रशासनाच्या पाहणीत समोर आल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी परिसरातील कूपनलिका ‘सील’ करून बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाण्याचा नेमका स्रोत शोधणे, त्याचा प्रवाह रोखणे आणि नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करणे, ही आव्हाने आता प्रशासनासमोर आहेत.