अंबासन फाट्यानजीक
अपघातात एक ठार
अंबासन : नामपूर-मालेगाव रस्त्यावरील गेल्या आठवड्यात अंबासन फाट्यानजीक भरधाव वाहनाने चारचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चेतन सुनील पाटील या तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी मंगळवारी (ता.१७) तक्रार दाखल झाल्याने पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नामपूर-मालेगाव रस्त्यावरील अंबासन फाट्यानजीक मंगळवारी (ता.१०) रात्री हा अपघात घडला. नामपूरकडून मालेगावच्या दिशेने वाहन (एमएच १२ वायबी ०७३७) जात असताना समोरून येणाऱ्या वाहनावरील चालकाने समोरून येणाऱ्या वाहनाला कट मारला. यावेळी वाहनाच्या उजव्या बाजूला मागील टायरजवळ जोरदार धडक बसली. धडकेमुळे वाहन रस्त्यावर पलटी झाली. वाहनातील चेतन सुनील पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. तसेच सगर पाटील आणि जयेश चौधरी यांनाही कमरेला व हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमींची मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले.