धर्मांतर घोषणा वर्धापनदिनी
मुक्तीभूमीवर आज कार्यक्रम
----------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. १३) मुक्तीभूमी येथे विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्म ध्वजारोहण, समता सैनिक दल संचलन, कबड्डी, धावणे, लाठीकाठी प्रात्यक्षिके आणि मुख्य धम्म मेळावा होणार आहे. सकाळी नऊला मुक्तीभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संघ व सैनिक रॅलीने होणार आहे. सकाळी दहाला भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होईल. त्यानंतर समता सैनिक दलाचे संचलन होणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कबड्डी, धावणे आणि लाठीकाठी स्पर्धा व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत मुख्य धम्म मेळावा होईल. मेळाव्यात भीमराव आंबेडकर, सुजात आंबेडकर, अमन आंबेडकर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध महासभेतर्फे करण्यात आले आहे.
मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ हे सकाळी साडे दहाला मुक्तीभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. सायंकाळी शहरातील शनिपटागंण येथे भीमशक्तीतर्फे माजी समाजकल्याण मंत्री, खासदार चंद्रकांत हंडोरे यांची जाहीर अभिवादन सभा होईल. सिनेअभिनेत्री तथा महिला शाहीर सीमाताई पाटील, पार्श्वगायक जाॅली मोरे यांचा क्रांतिकारी भीमगितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केले आहे. दरम्यान बार्टी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांसाठी पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, प्रकाशव्यवस्था व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा, वाहतूक नियंत्रण, वाहनतळ आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. विविध मार्गांनी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली असून, वाहनचालकांनी निर्धारित ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कार्यक्रमाचे बार्टीच्या युट्यूबवर थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.