नियुक्तीच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या पर्यवेक्षिकेला रंगेहाथ अटक

नियुक्तीच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या पर्यवेक्षिकेला रंगेहाथ अटक
Published on: 
अंगणवाडी मदतनीस पदाच्या नियुक्तीसाठी दहा हजारांची लाच सुरगाण्यात पर्यवेक्षिका ‘एसीबी’च्या जाळ्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून नियुक्तिपत्र मिळवून दिल्याच्या मोबदल्यात २० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारताना सुरगाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील पर्यवेक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (ता. १९) पकडले. हेमलता धवळू गाढवे (वय ५३, रा. शांतीनगर, सुरगाणा, जि. नाशिक) असे संशयित पर्यवेक्षिकेचे नाव आहे. तक्रारदार महिलेची ३० सप्टेंबर रोजी सुरगाणा तालुक्यातील शिराटा येथील अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून नियुक्ती झाली होती. त्याबाबतचा आदेश मिळाल्यानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. हे केंद्र माणी बिटअंतर्गत येत असल्याने संबंधित बिटच्या पर्यवेक्षिका गाढवे यांनी, ‘तुमची मदतनीस म्हणून निवड करून नियुक्तीचे आदेश मिळवून दिले आहेत,’ असे सांगत वरिष्ठांच्या नावाने तसेच स्वतःसाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने १२ ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणीत संबंधित पर्यवेक्षिकेने लाचेची मागणी केल्याचे आणि तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी (ता. १९) सुरगाणा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार महिलेकडून पंच साक्षीदारांसमक्ष दहा हजारांची रक्कम स्वीकारताना ‘एसीबी’च्या पथकाने गाढवे यांना पकडले. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, अंमलदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, योगेश शिंदे आणि परशराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com