NSK26H35143 : अनिल सपकाळे
----
ट्रकखाली सापडल्याने दुचाकीस्वार मामाचा मृत्यू
विटनेरजवळ भरधाव वाहनाचा कट; मागे बसलेला भाचा गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१६ : भरधाव वाहनाने दुचाकीला कट मारल्याने अनिल नागो सपकाळे (वय ४३, रा. दापोरा, ता. जळगाव) हे खाली पडले व त्यांच्या पायावरून ट्रक गेल्याने ते ठार झाले. तर त्यांचे भाचे जानकीराम किसन सोनवणे (रा. दापोरा) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. १५) विटनेर गावाजवळ झाला.
अनिल सपकाळे व त्यांचे भाचे जानकीराम सोनवणे हे सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथून ते दापोरा येथे घरी परतत असताना विटनेर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला एका सुसाट वाहनाने कट मारला. त्यामुळे तोल जाऊन दुचाकीस्वार मामा-भाचे खाली कोसळले. त्याच वेळी मागून येणारा ट्रक सपकाळे यांच्या पायावरून गेला. तसेच सोनवणे यांनाही दुखापत झाली. जखमीने याविषयी नातेवाईकांना माहिती दिली व ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अनिल सपकाळे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.