मालेगावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट | Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Animals

मालेगावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व, पश्‍चिम भागातील विविध प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट कुत्री व जनावरांमुळे तसेच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या झुंडी ठाण मांडून असल्याने वाहनधारकही त्रस्त झाले आहेत. अनेक प्रमुख भागात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट कुत्री व जनावरांमुळे सातत्याने अपघातही होत आहेत. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणापाठोपाठ मोकाट जनावरे पकडण्याची व दंडाची मोहीम राबविणे आवश्‍यक आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे व कारवाईची भिती नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे मोकाट जनावरांचे मालक मिळून येत नाहीत. रात्री मात्र जनावरे मालक आपापली जनावरे शोधून घेवून जातात. दुध काढून गोधन मोकाट सोडून दिले जाते. शहरातील पश्‍चिमेकडून पुर्वेकडे बाजारपेठेत जाण्यासाठी मुख्य मार्ग असलेल्या रामसेतू पूलावर सातत्याने मोकाट जनावरे असतात. गुळबाजार, किल्ला, सराफ बाजार या प्रमुख बाजारपेठांमध्येही जनावरे आढळून येतात. अनेक भागात ही जनावरे थेट रस्ता अडवून बसतात.

हेही वाचा: नाशिक : ZP, पं. समितीसाठी हालचाली गतिमान

पशुधनाबरोबरच मोकट कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. शहरातील असंख्य लहान मुलांना श्‍वान दंश नित्यनेमाचा झाला आहे. पूर्व भागातील रस्त्यावरील हाडे, मांस यामुळे कुत्री रक्ताला चटावली आहेत. रात्री- अपरात्री अनेक रस्त्यांवर एकटे- दुकटे जाणेही यामुळे शक्य होत नाही. पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांवर कुत्री भुंकतात. त्यामुळे वाहनचालक बिथरुन वारंवार अपघात झाले आहेत. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या अंगावर मोकाट जनावरे कधी धावून येतील, हे सांगता येत नाही.

या भागात संख्या अधिक

कमालपुरा, गुळबाजार, मोहंमद अली रोड, रामसेतू, महात्मा फुले रस्ता, सोयगाव मराठी शाळा, इंदिरानगर, मोसम पूल चौक, एकात्मता चौक, मार्केट परिसर, रावळगाव नाका, सोमवार बाजार यासह शहरातील भाजीबाजारांमध्ये मोठ्या संख्येने मोकाट जनावरे आहेत. भाजीपाला व फळफळावळ विक्रेत्यांनाही मोकाट जनावरांचा मोठा त्रास आहे. थोडेसे दुर्लक्ष झाल्यास शेकडो रुपयांची फळे व भाजीपाला ही जनावरे फस्त करतात.

हेही वाचा: पावसाळ्यात गेल्यावर्षीपेक्षा 244 टँकरद्वारे अधिक पाणीपुरवठा

कचऱ्यामुळेही समस्या वाढली

शहरात कचरा टाकण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप सुरू आहेत. या कचऱ्यात अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या मोकाट जनावरांना कोण ‘लगाम’ घालणार, हा प्रश्‍न आहे.

Web Title: Animals Roam The Streets In Malegaon Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashikanimals
go to top