फोटो : H33568
--------------
‘अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन’ ६ डिसेंबरला
देश-विदेशातील नामवंत धावपटू सहभागी होणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : ‘स्पोर्ट्स डेस्टिनेशन आणि मॅरेथॉन सिटी’ हि नाशिकची ओळख बनविण्यासाठी ‘अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन’ च्या सहाव्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून, शहरातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या अधिकृत निळ्या रंगाच्या आकर्षक जर्सीचे अनावरण करण्यात आले.
येत्या ६ डिसेंबरला अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रनचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट येथून सकाळी पाच वाजता ही स्पर्धा सुरु होईल. स्पर्धा ३, ५, १०,१५ ३०, ५० व १०० किलोमीटर या विविध वर्गात होणार असून देश-विदेशातील नामवंत धावपटू यात सहभागी होणार आहेत. नाशिकचे माजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्पर्धा सुरु झाली आहे. स्पर्धा केवळ धावण्यापुरती मर्यादित नसून ‘रन फॉर ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत प्रत्येक नोंदणीमागे एक झाड लावले जाते. आतापर्यंत या उपक्रमातून आठ हजारांहून अधिक झाडे लावली गेली आहेत. तसेच ग्रामीण भागातील मुलांना मोफत प्रशिक्षण व सहभाग देऊन त्यांना क्रीडा क्षेत्रात संधी देण्याचे सामाजिक कार्यही याद्वारे केले जाते. जर्सी अनावरण कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीता नारंग यांनी नव्या रेस कॅटेगिरी (स्पर्धा प्रकार) आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ट्रेल रनिंग असोसिएशन संलग्नतेबाबत माहिती दिली. त्यानंतर तेजस चव्हाण यांनी अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रनचे व्हिजन उपस्थितांसमोर मांडले.
या सोहळ्याला मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, पोलिस उपायुक्त किशोर काळे, मनीष अग्रवाल, प्रफुल्ल मुंगी, शुभम गिरासे, कर्नल राजीव सिंग, गौरी चव्हाण, तन्वी देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना वैद्य यांनी केले, तर सोनाली दाबक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
------------------