पान दोन
---------------
13426, 13427
वणी : किसनलालजी बोरा स्कूलच्या २१ क्रीडा महोत्सवात रोप मल्लखांब व योगा प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी.
खेळामुळे जीवनात शिस्त, चिकाटी, संघभावना
महेंद्र बोरा : वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ४ : खेळ हा केवळ विजय मिळविण्याचे माध्यम नसून शिस्त, चिकाटी, संघभावना आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणारा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन महेंद्र बोरा यांनी केले. श्री. किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या २१ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासह शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि साहसी वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रज्वलित मशालींसह केलेले संचलन, मार्च पास्ट आणि शिस्तबद्ध परेडने उपस्थितांचे लक्ष वेधले. दुर्गेश धुळे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. प्राचार्या योगिता चिंचोले यांनी स्वागत व प्रास्ताविकातून क्रीडा महोत्सवाचे महत्त्व विशद केले. खेळामुळे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक क्षमता, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द वाढीस लागते, असे त्यांनी सांगितले.
या वर्षीचा ‘बेस्ट हाऊस ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार येलो हाऊसने पटकावला. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
चिमुकल्यांपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध ड्रिलचे शिस्तबद्ध सादरीकरण केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली साहसी खेळांची प्रात्यक्षिके महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली. झिपलाइन, रॅपलिंग, योगा, कराटे, एरोबिक्स, हॉर्स रायडिंग, रायफल ड्रिल, रोप मल्लखांब, पोल मल्लखांब, लाठीकाठी, ढाल-तलवार, स्टिक फाइट आणि आर्मी ॲक्ट अशा विविध खेळांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. फायर जंप या साहसी प्रात्यक्षिकाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. विद्यार्थ्यांचे धाडस, चपळता, शारीरिक क्षमता आणि कौशल्य उपस्थितांना बघावयास मिळाले.
यावेळी सरपंच मधुकर भरसट, रवीकुमार सोनवणे, बाळासाहेब मेधणे, सुरेश कोंड, नामदेवराव घडवजे, गंगाधर निखाडे, प्रफुल्ल बोरा, डॉ. प्रतीक बुरड, माधुरी बोरा, डॉ. शुद्धी बोरा, प्रवीण दोशी, अनिल गांगुर्डे, नितीन झोटिंग, प्रवीण कड यांच्यासह संस्थेचे संचालक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व पालक उपस्थित होते. संचालक किशोर बोरा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.