शालेय खो-खो स्पर्धेत
अनुभूती विद्यालय विजेते
जळगाव, ता. ४ : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांच्या १६ संघांनी सहभाग घेतला होता. यात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम माध्यमिक विद्यालयाने द्वितीय, तर आर. आर. विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशू पोळ, माजी खेळाडू डॉ. तुषार राणे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या खजिनदार विद्या कलंत्री, राज्यस्तरीय पंच दिलीप सूर्यवंशी व क्रीडा शिक्षिका सरस्वती पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. डी. सोनवणे यांनी केले. क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे व जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून विशाल पाटील, गोपाळ पवार, छगन मुखडे, कमलेश पावरा, केतन चौधरी, मोहित गुंजकर, हिमांशू पाटील, हर्षल बेडीसकर व प्रथमेश कंखरे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनसह गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीच्या खेळाडूंनी सहकार्य केले.