लोगो : औरा बार गोळीबार प्रकरण
पीएल ग्रुपच्या ‘बॉस’च्या सुटकेनंतर
भूषण लोंढेचीही जामिनासाठी धाव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : सातपूर पोलिस ठाण्यात दाखल आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणी कुख्यात पीएल ग्रुपच्या लोंढे पितापुत्रांसह टोळीविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या गुन्ह्यात टोळीचा म्होरक्या व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर, त्याचा मुलगा भूषण लोंढे यानेही जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर बुधवारी (ता. २१) सुनावणी होणार आहे.
त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल येथील औरा बारमध्ये ५ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. यात एक युवक जखमी झाला होता. या प्रकरणी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्यासह पीएल टोळीविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या टोळीविरोधात गोळीबार, प्राणघातक हल्ले, खंडणी आणि इतर गुन्ह्यांत सक्रिय सहभाग असलेल्या लोंढे टोळीविरुद्ध सातपूर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पीएल ग्रुपविरोधात मकोकांतर्गत कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, खटला नियमित सुरू आहे. मकोकांतर्गत भूषण ऊर्फ ‘भाईजी’ लोंढे, शुभम ऊर्फ भुऱ्या राजू पाटील, वेदांत संजय चाळगे, प्रकाश ऊर्फ ‘बॉस’ लोंढे व दीपक ऊर्फ ‘नाना’ लोंढे यांच्यावर खटला सुरू आहे.
प्रकाश लोंढे याने टोळीतील प्रत्येकाला सोन्याच्या २३ अंगठ्या देत दीपक लोंढे याने खंडणीचा पैसा ‘व्हाइट’ करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाल्याचा ठपका न्यायालयाने ठेवत त्याचे जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश लोंढेला दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केला. प्रकाश लोंढे गेल्या गुरुवारी (ता. १५) नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला; परंतु गेल्या चार दिवसांत तो नाशिकच्या सातपूर परिसरात आलेला नाही. तर, भूषण लोंढे यानेही जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत नियमित सुनावणी सुरू असून, सरकार पक्षाचा युक्तिवाद पुढील तारखेला होण्याची शक्यता आहे.
गोळीबाराच्या गुन्ह्यात पीएल ग्रुपच्या लोंढे पितापुत्रांसह संशयित प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश ऊर्फ अभिजित अडांगळे, संतोष शेट्टी पवार ऊर्फ जल्लाद, अमोल पगारे, देवेश शेरताठे, शुभम गोसावी, सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर, शुभम निकम, राहुल गायकवाड, निखिल निकुंभ, संदीप गांगुर्डे, बारचालक बिपिन पटेल व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पटेल, शेट्टी, गोसावी, जोशी, शेरताटे, वाघमारे, निकम, गायकवाड यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.