नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ !
नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ !

नाशिकसाठी व्हावे स्वतंत्र विद्यापीठ !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्रात सुमारे सातशेहून अधिक महाविद्यालये, संस्‍था कार्यरत आहेत. परंतु नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक विस्‍तार आणि पुणे विद्यापीठावरील वाढता भार पाहता जिल्‍हास्‍तरावर नाशिक विद्यापीठाची गरज निर्माण झाली आहे. भारतीय आर्थिक परिषदेचे उपाध्यक्ष व बीवायके महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. गंगाधर कायंदेपाटील यांनी हा विषय उचलून धरत शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या विषयावर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा चर्चा होणार, हे स्पष्ट आहे. किंबहुना ही चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. राजकीय इच्छाशक्ती या संदर्भात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात आढावा घेऊन उच्चशिक्षण विभागाला या संदर्भात सूचना करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निर्णय नाशिकमध्ये राजकीयदृष्ट्यादेखील उपयुक्त ठरू शकतो.

जळगाव येथे १९९० मध्ये जेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा खानदेशचे नेते एकनाथ खडसे यांनी विद्यापीठाचे मुख्यालय जळगावला खेचून नेले. त्यामुळे नाशिक त्यात सामील होण्याचा प्रश्नच नव्हता. मुख्यालय नाशिकला असावे, अशी मागणी त्या वेळी होती. जळगाव विद्यापीठ असावे, यासाठी तेव्हा उग्र आंदोलनं झाली होती. तेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य केंद्र नाशिकला झाले असते, तर पुणे विद्यापीठाशी संबंध संपुष्टात आला असता. आजही जळगावच्या विद्यापीठातील उत्तर शब्द उचित ठरत नाही. नाशिक त्यात अंतर्भूत नसल्याने जळगावचे विद्यापीठ तीन जिल्ह्यांचे अर्थात खानदेश विद्यापीठ आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नामविस्तारावेळी हा बदल करता आला असता. असो... आता नाशिकच्या बदलत्या शैक्षणिक गरजा आणि वाढत्या शैक्षणिक विश्वासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज पूर्ण व्हायला हवी.

हेही वाचा: मालेगावच्या महिलांचे हिजाबला समर्थन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुणे, नगरसह नाशिक असे तीन जिल्ह्यांचे आहे. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सध्या सर्व विद्या शाखांची मिळून सातशेहून अधिक महाविद्यालये, संस्था आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक शहराजवळ शिवनई परिसरात जागा घेतली आहे. सध्या पुणे विद्यापीठाचे नाशिक जिल्हा उपकेंद्र नाशिक महापालिका इमारतीत आहे.

सध्या राज्यात सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे सोलापूर या एकमेव जिल्ह्यासाठी असलेले विद्यापीठ आहे. मुख्यमंत्रिपदी सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी विजयसिंह मोहिते-पाटील असताना शिवाजी विद्यापीठातून सोलापूर हा जिल्हा बाजूला करून सोलापूर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आता त्याचपद्धतीने पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाशिक जिल्हा बाजूला करून नाशिक येथे विद्यापीठाची निर्मिती होणे शक्य आहे. विद्यापीठासाठी शिवनई येथे पुरेशी जागा असून, शिक्षक व शिक्षकेतरपदाची निर्मिती त्यासाठी करावी लागेल. नाशिक विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्याच्या येत्या अंदाजपत्रकात किमान शंभर कोटींची आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या उच्चशिक्षण विभागानं तरतुदीसंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागास सादर केल्यास पुढील कारवाई होऊ शकते. तिथे राजकीय इच्छाशक्तीची गरज असेल. पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागाकडे असलेल्या एकूण मुदत ठेवींपैकी एकतृतांश ठेवीची रक्कम नाशिक विद्यापीठाला मिळाल्यास त्यातूनही आर्थिक हातभार लागू शकतो.

नाशिक विद्यापीठाच्या विकासासाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते. मात्र, त्यासाठी ठोस प्रयत्न व्हायला हवे. या रकमेतून विद्यापीठाचा पायाभूत विकास होऊ शकेल. जिल्ह्यात अनेक कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षण, अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, विधी महाविद्यालये अनुदानित आणि विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून नाशिक विद्यापीठाच्‍या स्‍थापनेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज ओळखून कार्यवाही होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Article Dr Rahul Ranalkar Writes Nashik Independent University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top