भोंदू अरुण पाटीलच्या मागावर पोलिस
पनवेलच्या महिलेची साडेसात लाखांत फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : आजार बरा करण्याचे आणि दैवी शक्तीच्या जोरावर पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पनवेल महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदू अरुण धोंडू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संशयित अरुण पाटील पसार झाला असून, गंगापूर पोलिसांसह गुन्हेशाखेची पथके त्याच्या मागावर आहेत. लगतच्या तालुक्यासह परजिल्ह्यात त्याचा कसून शोध सुरू आहे.
पनवेल येथील आजारी महिलेस नाशिकच्या गंगापूर शिवारातील भोंदूबाबा अरुण पाटील याने तिला व तिच्या पतीला डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नाशिकला आणले. अघोरी पूजा केल्यानंतर त्यांचे आजारपणाचा काहीसा गुण आल्याचा आभास निर्माण केला. याचाच गैरफायदा घेत त्याने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून आणले. अघोरी साहित्य वापरून पूजा केली. घरी गेल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून भोंदूने वेगवेगळ्या तीन पूजाविधींच्या नावाखाली एकूण साडेसात लाख रुपये उकळले. मात्र, दिवस लोटूनही पैशाचा पाऊस पडला नाही आणि महिलेचा आजारही बरा झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पैसे मागितले असता भोंदूने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संशयित पाटील पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांसह शहर गुन्हेशाखेची पथकेही त्याच्या मागावर आहेत. पोलिस निरीक्षक जमीर शेख तपास करीत आहेत. दरम्यान, अशाच प्रकारे या भोंदूने फसवणूक केलेल्या नागरिकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन शहर पोलिस व अंनिसतर्फे करण्यात आले आहे.