खरातच्या दोषनिश्चितीवर
आता २७ ला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांच्या शोषणासह फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात याच्यावरील दोषनिश्चितीवर २७ तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
भोंदू खरात याने स्वतःला दैवी अवतार सांगत पीडित महिलांवर अत्याचार केला होता. या प्रकरणी गेल्या १७ मार्च २०२६ ला सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्या अटकेनंतर एकापाठोपाठ एक नऊ गुन्हे खरातविरोधात दाखल झाले होते. यात आठ गुन्हे अत्याचाराचे, तर दोन गुन्हे फसवणुकीचे सरकारवाडा पोलिसांत दाखल आहेत. आत्तापर्यंत आठ गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांत दोषारोपपत्र सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले असून, अजून दोन दोषारोपपत्रे दाखल होणार आहेत.
शोषणप्रकरणी खरातने जामिनासाठी धाव घेतली असून, त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे. खरातविरोधात दोषनिश्चितीची नियमित सुनावणीदरम्यान मंगळवारी (ता. २१) सरकार पक्षातर्फे नमुना दोषनिश्चिती दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यावरील सुनावणी २७ तारखपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ॲड. राहुल कासलीवाल खरातच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.