फोटो : H35149
नाशिक : अशोका बिझनेस स्कूलमध्ये आयोजित मॅनेजमेंट गुरू स्पर्धेतील विजेत्यांसमवेत उपस्थित मान्यवर.
---
व्यवस्थापन कौशल्यांचे विद्यार्थ्यांनी घडविले दर्शन
अशोका बिझनेस स्कूलमध्ये ‘मॅनेजमेंट गुरू’ स्पर्धेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : राणेनगर येथील अशोका बिझनेस स्कूलमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘मॅनेजमेंट गुरू’ स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील नामवंत विचारवंत, लेखक यांच्या योगदानाची ओळख करून देणे, तसेच त्यांच्या विचारांचा व्यावहारिक जीवनात उपयोग करण्याची प्रेरणा देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती.
महाविद्यालयाचे माजी संचालक डॉ. डी. एम. गुजराथी यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘ज्ञानातून शब्दांकडे’ संकल्पनेवर आधारित स्पर्धेच्या तृतीय फेरीची ‘ज्ञान से सृजन तक’ अर्थात इन्फोग्राफिक फेरी व अंतिम फेरी नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील सहभागी संघात तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये सुधा मूर्ती, डॉ. अब्दुल कलाम, देवदत्त पट्टनायक, पीटर ड्रकर, स्टीफन कोवी, सायमन सिनेक, डेल कार्नेगी अशा भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ४० व्यवस्थापन गुरूंचा समावेश केला होता. एकूण ३७ संघांनी नोंदणी केली होती. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ‘ज्ञान प्रस्तुती’ या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी सात ते दहा मिनिटांच्या पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे निवडलेल्या व्यवस्थापन गुरूंचे कार्य व विचार मांडले. परीक्षण डॉ. महेश वाघ, डॉ. सुवर्णा शिंदे यांनी केले. या फेरीतून ३७ पैकी २७ संघांची पुढील फेरीसाठी निवड झाली. ‘विद्या संवाद’ या पॉडकास्ट स्वरूपात आयोजित दुसऱ्या फेरीत दृश्य सादरीकरणाऐवजी विद्यार्थ्यांच्या विचारमांडणीला, संवादकौशल्याला आणि विषयाच्या आकलनाला प्राधान्य दिले. परीक्षण अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके, तसेच डॉ. परमेश्वर नाथ बिरादार यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. मोनालिसा जैन, मधुमिता गोस्वामी उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनू कोशी, वैष्णवी बोरोले यांनी केले. स्पर्धेविषयीची भूमिका प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. तनुजा दुबे यांनी केले. प्रभारी संचालक डॉ. सुवर्णा शिंदे, डॉ. महेश वाघ आदी उपस्थित होते.
-----चौकट
यांनी मिळविले यश..
स्पर्धेत प्रथम पारितोषिक अक्षदा गामणे, महेक कलारिया, एनन कुदाई यांच्या गटाने मिळविले. द्वितीय झोया सय्यद, भार्गवी वाघ, जस्मिन शेख यांच्या गटाने, तृतीय पारितोषिक संस्कृती वारुंगसे, साक्षी तिडके, श्रुती सिंग यांच्या गटाने पटकाविले. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केले. कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले.