
Nashik Crime News : डोंगराळेत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण
मालेगाव (जि. नाशिक) : महावितरणचे करंजगव्हाण कक्षचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर साबळे यांना डोंगराळे (ता. मालेगाव) येथे वीजबिल वसुली करत असताना वीज ग्राहकांनी शिवीगाळ व मारहाण केली.
मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याच्या या घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Assistant engineer of Mahavitaran assaulted in hill Nashik Crime News)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
वीज अधिकारी, कर्मचारी संयुक्त कृती समितीने मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध करतानाच दोषींना अटक करावी. कठोर कारवाई करावी अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सहाय्यक अभियंत्यांवर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मोती भवन कार्यालयात जमा झाले.
द्वार सभा झाली. यानंतर संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून महावितरणचे कार्यकारी अभियंता जे.के.भामरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. संयुक्त कृती समितीतील जी.एच. वाघ, प्रवीण वाघ, आनंद आढाव आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.