निसर्ग पर्यटन
खानदेशातील आदिवासी वारशाचे अनोखे दर्शन
--------------------------------------
अस्तंबा डोंगरावर श्रद्धा, संस्कृतीचा जागर
सातपुड्याच्या पर्वतरांगांतील अस्तंबा डोंगर म्हणजे आदिवासी समाजाच्या श्रद्धेचे, सांस्कृतिक अस्मितेचे आणि समृद्ध परंपरेचे प्रतीक. धनत्रयोदशीपासून आठवडाभर भरणाऱ्या यात्रोत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधव देव आहट्याच्या पूजनासाठी एकत्र येतात. डोंगर शिखरावरील धार्मिक विधी, लोककला आणि निसर्गाशी जोडलेली जीवनसंस्कृती यामुळे अस्तंबा यात्रा खानदेशातील आदिवासी वारशाचे अनोखे दर्शन घडवते.
- संतोष पावरा, नंदुरबार
सातपुडा पर्वतरांग आणि तापी-नर्मदा नदीच्या परिसराशी आदिवासी समाजाचे अतूट सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते जोडलेले आहे. येथील डोंगर, जंगल, नद्या आणि पवित्र स्थळे आदिवासींच्या मौखिक इतिहासाची, श्रद्धेची आणि जीवनसंस्कृतीची साक्ष देतात. वीरभारी, जलसिंधी, राणिकाजल, याहा मोगी संबंधित श्रद्धास्थाने आणि शेतीसंस्कृतीशी निगडित ‘हेलोदाब’सारख्या परंपरा या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. सातपुड्यातील तोरणमाळ हे निसर्गसौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ आहे. हिरव्यागार पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि आल्हाददायक वातावरणामुळे हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करते. याच पर्वतरांगेतील अस्तंबा डोंगर आदिवासी समाजाचे आराध्य देव आहट्या यांच्या पूजास्थानामुळे विशेष महत्त्व प्राप्त करतो. सुमारे ४ हजार फूट उंच असलेल्या डोंगराच्या शिखरावर पोहचून आहट्या देवाचे पूजन केले जाते. यावेळी मानाचे ध्वज लावले जातात.
ही यात्रा दरवर्षी धनत्रयोदशीला सुरू होऊन पुढे आठवडाभर सुरू असते. बाहेरील जगात हे स्थळ ‘अश्वत्थामा शिखर’ म्हणून ओळखले जाते. तथापि, महाभारतातील अश्वत्थामा आणि आदिवासी मौखिक परंपरेतील देव आहट्या यांच्याविषयीच्या श्रद्धा स्वतंत्र सांस्कृतिक संदर्भांतून समजून घेणे आवश्यक आहे. आदिवासी समाजासाठी अस्तंबा डोंगर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, सांस्कृतिक अस्मिता आणि पूर्वजांशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. या डोंगरावर जाण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा किंवा शहादा येथून जाण्याचा मार्ग आहे.
डोगे दिवाळी अर्थात देव आहट्या पूजन ही आदिवासी समाजाची महत्त्वपूर्ण परंपरा आहे. मौखिक इतिहासानुसार, या पूजनात पवित्र स्नान, पालनी (व्रत), डफ आणि पावलीच्या तालावर नृत्य, तसेच रोषा गवत आणि ज्वारीचे कणीस अर्पण करण्यासारखे विधी आजही केले जातात. या परंपरेतून आरोग्य, धनधान्यवृद्धी, सामूहिक सहकार्य आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते व्यक्त होते. सोंगाड्या पार्ट्यांच्या नाट्यपरंपरेलाही या पूजनातून सांस्कृतिक प्रेरणा मिळते. अस्तंबा डोंगराचा पर्यटन विकास स्थानिक आदिवासी समाजाच्या सहभागातून आणि त्यांच्या सांस्कृतिक भावविश्वाचा आदर राखून होणे गरजेचे आहे.
मौखिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण, स्थानिक युवकांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून संधी, बोलीभाषा व लोककलांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य दिले पाहिजे. पर्यटनाच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा, जैवविविधता आणि सांस्कृतिक परंपरांचे नुकसान होणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे. देव आहट्या पूजन आणि अस्तंबा डोंगराचे जतन म्हणजे केवळ एका धार्मिक परंपरेचे संवर्धन नव्हे, तर आदिवासी समाजाचा इतिहास, सांस्कृतिक अस्मिता आणि भावी पिढ्यांचा अमूल्य वारसा जपणे होय.