Nashik : लसीकरणासाठी मनपा नागरिकांच्या दारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik muncipal corporation

लसीकरणासाठी मनपा नागरिकांच्या दारात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या लसीचे डोस अद्यापही पूर्ण क्षमेतेने घेतले जात नसल्याने अखेरीस महापालिकेने ‘हर घर दस्तक अभियान'' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत १३१ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामार्फत शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. या अभियानाच्या माध्यमातून विभागीय वैद्यकीय अधिकारी, तसेच विभागीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्ट ड्रेसिंग टीम पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा तर ज्या नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतला नाही त्यांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शंभर टक्के मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरामध्ये २६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना लस देण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर साठ वर्षांपुढील त्यानंतर पंचवीस ते चाळीस वर्षाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. एक मेपासून १८ वयोगटातील पुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पुन्हा पंचेचाळीस वयोगटात पुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिका हद्दीमध्ये पहिला डोस घेतलेले आठ लाख ४६ हजार ३५८ नागरिक आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या चार लाख ३६ हजार ४५२ आहे.

शहरात एकूण १४ लाख ८० हजार लोकसंख्या आहे. वाढीव लोकसंख्येचा विचार करता वीस लाखांपर्यंत संख्या गेली आहे, मात्र पुरेशा प्रमाणात अद्यापही लसीकरण झालेले दिसून येत नाही. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या जवळपास ५८ टक्के, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या चाळीस टक्क्यांपर्यंत असल्याने लसीकरण करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

घरोघरी जाऊन लसीकरणाची वेळ

एप्रिल मे व जून महिन्यात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पहाटेपासूनच नागरिक केंद्रांवर जाऊन रांगा लावत होते, मात्र पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होत नव्हता. अवघ्या पन्नास ते शंभर लसी उपलब्ध होत होत्या. त्यातही दोन तासातच लसींच्या साठा संपुष्टात येत असल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र, आता मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होऊनही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेला घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची वेळ आली आहे.

पहिल्या दिवशी १३१ पथकांनी ५,६४६ घरांना भेटी दिल्या. त्यात बारा हजार १६२ नागरिकांचे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षणात १८ वर्षांवरील दोन्ही डोस घेतलेले ७,३२३ नागरिक तर पहिला डोस घेतलेले १,६०९ नागरिक आढळले. ६८ नागरिकांना पहिला डोस दिला. मुदतीत लसीकरण न केलेल्या ६६ नागरिकांना दुसरा डोस दिला.

loading image
go to top