Nashik Crime : मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न! अनिवासी भारतीय दांपत्यासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime : मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न! अनिवासी भारतीय दांपत्यासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : तक्रारदाराच्या आईच्या मृत्युपत्रात फेरफार करून त्या आधारे मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे, तसेच मिळकतीमध्ये मज्जाव केल्याप्रकरणाची जिल्हा न्यायालयाने दखल घेत, देवळाली कॅम्प पोलिसांना सदर गुन्ह्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसात याप्रकरणी संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (attempt to swallow property case registered against woman along with non resident Indian couple Nashik Crime news)

शशांक विनोद झंवर, प्रियांका शशांक झंवर (दोघे रा. ॲटलान्टा, अमेरिका), सुधा कनाल- भाटिया (रा. मुंबई), असे तिघा संशयितांची नावे आहेत. रवींद्र मेघराज कनाल (रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीचा मेघ मल्हार नावाचा बंगला आहे.

संशयितांनी कनाल यांच्या संशयित बहिण सुधा कनाल हिच्या मदतीने रवींद्र कनाल यांच्या आईचे खोटे मृत्युपत्र दाखवून व त्यातील फेरफारच्या आधारे संपूर्ण मिळकत हडपण्याचा संगनमताने कारस्थान रचले.

कनाल हे बंगल्याचे मालक असताना त्यांना बंगल्यात येण्यास मज्जाव करीत मारहाण केली. बंगल्यातील कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट केले. तसेच, त्यांच्या आईचे दागदागिने व मौल्यवान चीजवस्तूंचा संशयितांनी अपहार केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासंदर्भात पीडित कनाल यांनी देवळाली कॅम्प पोलिसात तक्रारही दिली. परंतु तक्रार दाखल करून न घेता टाळाटाळ केली. त्यामुळे कनाल यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत संशयितांविरुद्ध दावा दाखल केला.

त्यांच्यातर्फे ॲड. उमेश वालझाडे, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. प्रशांत देवरे यांनी युक्तिवाद करून बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने सदर दाव्याची गंभीर दखल घेत, गेल्या ३० जानेवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यास या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, देवळाली कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी संशयित तिघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गेल्या सोमवारी (ता. ६) गुन्हा दाखल केला आहे.