
Nashik News: दोन दिवसांत अवकाळीचे पंचनामे पूर्ण - गंगाथरन डी
नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३२३ गावातील चार हजारांच्या आसपास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे दोन कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.
नाशिक जिल्ह्याला गेल्या आठवड्यात अवकाळीने दणका दिला. शुक्रवारपासून (ता.२४) पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २३) पुन्हा पंचनाम्यांचा आढावा घेतला. तसेच, वेळेत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कामे गतीने सुरू आहेत. आतापर्यंत साधारण ५ दिवसांचे पंचनामे बाकी आहेत. ५ ते ८ मार्च दरम्यान झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २ कोटी ५८ लाखांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. अद्यापही पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरु आहे. येत्या दोन दिवसांत पंचनाम्याची कामे पूर्णत्वास जातील.
जिल्ह्यात ३२३ गावातील तीन हजार ९४६ शेतकऱ्यांच्या पिकाला अवकाळी पावसाचा दणका बसला. अवकाळी पावसामुळे साधारण सतराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे आतापर्यंत पुढे येत आहे. त्यात, निफाड एक हजार ३५५ तर त्यानंतर नाशिक तालुक्यातील २२९ हेक्टरचा समावेश आहे.