कुऱ्हाड हल्ल्यात दोन जखमी;
पाच संशयितांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसोदा गावात जुन्या भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून संशयितांनी फिर्यादी व त्याच्या चुलत भावावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. ज्यात दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोदा (ता.जळगाव) येथे दुर्गादास अशोक कोळी (वय ३१, रा. इंदिरानगर) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. रविवारी (ता.२५) सकाळी आठच्या सुमारास पाणी आणायला जात असताना जुन्या वादातून संशयितांनी एकत्रित येऊन दुर्गादास यांना घेराव घालत शिवीगाळ करीत भांडणला सुरवात केली. वाद विकोपाला जाऊन संशयितांनी कुऱ्हाडीने व तलवारीने हल्ला केला. यात दुर्गादास कोळी यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. त्यानंतर जखमीचा चुलत भाऊ विकास बाळू कोळी मध्यस्थी करीत असताना त्यांच्या उजव्या हातावर, कंबरेवर वार करून जखमी करण्यात आले असून जखमींच्या तक्रारीवरून संशयित रामचंद्र प्रल्हाद कोळी, योगेश रामचंद्र कोळी, युवराज रामचंद्र कोळी, सागर उर्फ गोपाल कैलास कोळी, समाधान कैलास कोळी (सर्व रा. आसीदा, ता. व जि. जळगाव) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.