YEO26B26955
धानोरे : मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिनानिमित्त उपक्रमात सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी
---------------
आयुर्वेद दिनानिमित्त ‘मातोश्री’त उपक्रम
रक्तदान शिबिराला प्रतिसाद, परिसरामध्ये वृक्षारोपण
-------------
सकाळ वृतसेवा
येवला, ता.२९ : मातोश्री शिक्षण संस्था संचलित धानोरे येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद दिनानिमित्त विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
प्राचार्या डॉ. ज्योती बडवे व संचालक सिद्धांत दराडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. निरोगी उद्यासाठी आयुर्वेद या विषयावरील रील स्पर्धेत द्वितीय वर्षाचा विद्यार्थी पवन रसावे याने प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी आयुर्वेद व आरोग्यविषयक जनजागृतीसाठी परिसरातून रॅली काढली. ‘आयुर्वेदावतरण’ व ‘त्रिदोष सिद्धांत’ या विषयांवरील पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विनाअग्नी स्वयंपाक’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पौष्टिक सॅलड, मोड आलेले कडधान्य, चाट, ब्लू-टी आदी आरोग्यदायी पदार्थांचे स्टॉल्स उभारले. मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योग सत्र घेण्यात आले.
नीता पाटील यांनी ‘रक्तदानाचे सामाजिक महत्त्व’, तर डॉ. जहीर चौधरी यांनी ‘रक्तमोक्षण’ या आयुर्वेदातील उपचार पद्धतीवर तांत्रिक व्याख्यान दिले. संजीवनी ब्लड बँकेतर्फे झालेल्या शिबिरात ३० स्वयंसेवकांनी रक्तदान केले. बॉडी पेंटिंग स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी मानवी शरीररचनाशास्त्राचे कलात्मक सादरीकरण केले. यात सृष्टी निकम हिने विजेतेपद मिळविले. आयुर्वेद दिन सप्ताह प्राचार्या डॉ. बडवे, समन्वयक डॉ. गौरी मोरे व डॉ. सीमरन कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
---------------