दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा पुन्हा गजबजणार
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची लगबग, परीक्षांचा अभ्यास सुरु
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : लाडू, करंजी, चकल्या, चिवडा अशा फराळावर ताव मारून झाल्यानंतर या आठवड्यापासून शाळांच्या द्वितीय सत्राला सुरुवात होणार आहे. दिवाळीच्या सुट्यांनंतर आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळा पुन्हा गजबजणार आहेत. दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून असाईनमेंट सादर करण्याची लगबग सुरु असून, यासोबत सत्र परीक्षेचा कसून अभ्यास सुरु असल्याचे चित्र आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत शाळांना दिवाळी सणानिमित्त सुट्या लागल्या होत्या. ऐरवी वर्गखोलीत पाठ्यपुस्तक, वह्यांमध्ये रमणारे विद्यार्थ्यांनी थोडी उसंत घेत, फराळावर मनसोक्त ताव मारला. मामाच्या गावाला हिंडूनफिरुन झाल्यानंतर व मित्रमंडळीसोबत धम्माल मस्ती केल्यानंतर आता बच्चे कंपनी पुन्हा शाळेत दाखल होणार आहे. शहरासह जिल्हाभरातील शाळा गुरुवार (ता.१९) पासून सुरु होत आहेत. सुरुवातीचे एक-दोन दिवस उपस्थिती रेंगाळण्याची शक्यता असली तरी, शालेय प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. सुट्या संपत असल्याने, शाळांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये सोमवार (ता.१६) पासून अध्ययन प्रक्रियेला सुरुवात झाली. बहुतांश अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची सध्या असाईनमेंट सादर करण्याची लगबग सुरु आहे. यासोबत पहिल्या सत्रातील काही अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांकडून अभ्यासाची उजळणी केली जाते आहे.