Bail Pola 2022 : आडगावात पारंपारिक पद्धतीने पोळा उत्साहात साजरा | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bail Pola Festival 2022 news

Bail Pola 2022 : आडगावात पारंपारिक पद्धतीने पोळा उत्साहात साजरा

नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यात समाविष्ट झालेल्या गावांपैकी सर्वाधिक लोकवस्तीचे गाव म्हणून आडगावची ख्याती आहे. मुंबई- आग्रा महामार्गावरील या गावात शुक्रवारी (ता. २६) पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत असलेल्या मारुतीच्या मंदिराजवळ सजविण्यात आलेल्या बैलांना घेऊन शेतकरी मोठ्या प्रमाणावर आले होते. (Bail Pola 2022 celebrated with enthusiasm in traditional way in Adgaon nashik latest marathi news)

नाशिकपासून सहा किलोमीटरवर असलेल्या आडगावात शुक्रवारी पोळ्याचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जमिनीचे तुकडे झाल्याने सहाजिकच पशुधनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे, परंतु याही परिस्थितीत गावातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही आपली खिल्लारी जोडी जपल्याचे आढळून आले.

कधीकाळी मळ्यात बैलांना सजवून त्यांना मारुतीच्या सलामीसाठी वेशीवरील मारुतीच्या मंदिरासमोर आणले जात असे, त्या वेळी या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, एवढे पशुधन होते. कालौघात ते निम्यापेक्षा अधिक घटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरीही पोळ्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.